मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यात सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावण्याचे काम चालू झाले आहे. नंबरप्लेट लाण्यासाठीची मुदत तीन महिने वाढवून मिळावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत आज (बुधवारी) केली आहे.
एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या सर्व वाहनांना ‘उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावणे सुप्रीम कोर्टाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार, राज्यात वाहनांना नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू झाले आहे. त्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ आहे. केवळ पुणे शहरातच सर्व प्रकारची ४० लाख वाहने आहेत. आजपर्यंत फक्त २ लाख वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात आली आहे. वाहनांची मोठी संख्या पाहता ३० एप्रिल पर्यंत पुण्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावणे सध्याच्या वेगाने अशक्य आहे. आरटीओ कार्यालयांत त्यासाठी सक्षम व्यवस्था नाही. हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झालेले आहेत. केवळ पुण्यातच नव्हे तर राज्याच्या विविध शहरांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे, याकडे आमदार शिरोळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
तसेच या नंबर प्लेट लावणारी सेंटर्स कमी असल्यामुळे नागरिकांना अपॉइंटमेंट लवकर मिळत नसून, राज्यात सेंटर्स वाढवून द्यावीत आणि नंबर प्लेट लावून देण्यासाठीची मुदत ३ महिने वाढवून द्यावी, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र आमदार शिरोळे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनाही पाठविले आहे.