मुंबई-मुंबईतील एअरटेलच्या एका कार्यालयातील हिंदी भाषिक महिला कर्मचाऱ्याने मराठीच्या मुद्यावरून मराठी तरुणाशी हुज्जत घातल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सदर कर्मचारी मराठी का आली पाहिजे? मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असे कुठे लिहिले आहे का? असे विविध प्रश्न विचारत मला मराठी येत नाही व मी बोलणारही नाही अशी उद्दाम भाषा वापरताना दिसून येत आहे. ठाकरे गटाने या प्रकरणी एअरटेलला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
गत काही महिन्यांपासून परप्रांतीयाच्या मुजोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एअरटेलच्या कार्यालयातील ही घटना समोर आली आहे. सदर व्हिडिओत मराठी तरुण एअरटेलच्या गॅलरीत उभा असल्याचे दिसत आहे. तो आपल्या व्हिडिओ म्हणतो, मी मागील अर्ध्या तासापासून येथे थांबलो आहे. पण माझी तक्रार सोडवली जात नाही. येथील कर्मचारी मराठीत संवाद साधण्यासही नकार देत आहेत. माझ्याशी ते उद्धटपणे बोलत आहेत. व्हिडिओत दिसत आहे की, महिला कर्मचारी सदर तरुणाशी हिंदीतून मोठ्या आवाजात बोलत आहे.
यावेळी मराठी तरुण तिला हळू आवाजात नीट बोलून आपली समस्या सोडवण्याचा आग्रह धरतो. पण ती उडवाउडवीची उत्तरे देते. ती आपल्या वरिष्ठांना सांगते की, ही व्यक्ती मला महाराष्ट्रात आहात तर मराठीत बोलले पाहिजे असे सांगत आहे. महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी आली पाहिजे, असे कुठे लिहिले आहे. मला मराठी समजत नाही. त्यामुळे मी हिंदीतच बोलेन. आपण हिंदुस्तानात राहतो. त्यामुळे कुणी कोणतीही भाषा बोलू शकतो. या प्रकरणी मराठी महत्त्वाची आहे असे मला वाटत नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.