आता लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहे–वरुण सरदेसाईंच्या प्रश्नाला उत्तर देताना अदिती तटकरे म्हणाल्या, ऑक्टोबर 2024 मध्ये आचारसंहितेच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या 2 कोटी 33 लाख 64 हजार लाभार्थी महिला होत्या. फेब्रुवारीत आपण हप्ता दिला तेव्हा लाभार्थी महिलांचा आकडा 2 कोटी 47 लाखाहून जास्त आहे. याचा अर्थ असा की आता लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.
मुंबई- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 करण्याचे आश्वासन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासंदर्भात कोणतीही घोषणा झाली नाही. यावरून आज सभागृहात विरोधकांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना प्रश्न विचारले. त्यासंदर्भात अदिती तटकरे विधानसभेत निवेदन केले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे त्या म्हणाल्या.
परंतु अदिती तटकरेंनी दिलेल्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? हे आधी सांगा, अशी भूमिका घेत विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे, केवळ मतांसाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच, लाडक्या बहिणींना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? या प्रश्नावरून आज सभागृहात गोंधळ झाला. विरोधकांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारले. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना अदिती तटकरेंची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? या प्रश्नासाठी त्यांनी अखेर फडणवीस, अजित पवार आणि शिंदे यांच्याकडे बोट दाखवून तूर्तास वेळ मारून नेली. अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केलाआज विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांनी काही लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला तेव्हाच त्यात नमूद करण्यात आले होते की 1500 हून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून लाभार्थी महिलांना मिळत असेल, तर त्यांना लाडकी बहीण योजना लागू होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
नमो शेतकरी महिला योजनेत महिलांना 1000 रुपयांचा लाभ मिळतो. शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान 1500 रुपयांचा लाभ शासनाकडून मिळायला हवा. त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिलांना त्या योजनेतून 1000 रुपये तर वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात. त्यामुळे त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले नाही. 20 ते 25 लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे अफवा आहेत, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी या योजनेसंदर्भात तीन प्रश्न विचारले. निवडणुकीपूर्वी योजना जाहीर केली तेव्हा किती लाभार्थी होते? निवडणुकीनंतर सगळे निकष लावले गेले, त्यामुळे नेमक्या किती लाभार्थी महिलांना अपात्र केले गेले? आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे महिलांना 2100 रुपये देणार आहात की नाहीत? असे प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केले. याला महिला व बालकल्याण मंत्री आदिती यांनी सविस्तर उत्तर दिले.
2100 रुपयांसंदर्भात CM व दोन्ही DCM निर्णय घेतील-दरम्यान, यावेळी आदिती तटकरेंनी यावेळी सन्माननिधीचा हप्ता 2100 रुपये होण्यासंदर्भात उत्तर दिले. महायुती सरकारने ही योजना आणली आहे. महिलांना 1500 रुपयांचा लाभ देणारे महायुतीचे एकमेव सरकार आहे. महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. 2100 रुपयांसंदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील. पण लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, असे आदिती तटकरे म्हणाल्या.