पुणे – नशेखोरी करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाईन सल्फेट (टर्मिन)या इंन्जेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणार्या दोन जणांना हडपसर पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून १ लाख रुपयांच्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन)च्या १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.निसार चाँद शेख (वय २३, रा. घाडगे गल्ली, शेख चाळ, हडपसर) आणि योगेश सुरेश राऊत (वय २५, रा. घुलेवस्ती, मांजरी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
हडपसर पोलिसांच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गस्त घालत असताना, विठ्ठलनगरचे पाठीमागील जिजामाता वसाहतचे मागील कॅनॉल येथे दोनजण संशयितरित्या फिरताना दिसून आले. पोलिसांना पाहून अचानक ते पळून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड यांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी करत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडील बॅगेत मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन) या नावाची इन्जेक्शनच्या ६० बाटल्या मिळून आल्या. हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन ५५० रुपयांना विकत असल्याचे आरोपिनी सांगितले. सखोल चौकशी दरम्यान त्यांच्याकडून मॅफेनटरमाइन सल्फेटच्या एकूण १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना देखील आणि संबंधित औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण त्यांनी घेतलेले नसल्याचे स्पष्ट झाले. हे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्लाशिवाय वापरल्यास व व्यक्तीला टोचल्यास त्यातील विषारी द्रव्याचे दुष्परिणाम होऊन औषध घेणार्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते, हे माहित असताना सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने विक्री करण्यासाठी आरोपींनी जवळ बाळगल्याचे दिसून आले.नागरिकांना अंमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांबाबत माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस उपनिरीक्षक सत्यावान गेंड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. |

