मुंबई : ” विकसित महाराष्ट्राच्या पाऊलखुणा राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेपुढे आल्या. राज्याच्या शाश्वत विकासाची रूपरेषा पुढे आली असून, केंद्र सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला कसा मिळेल, हेही या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे,” अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
ते म्हणाले,” शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरूण, विद्यार्थी, उद्योजकांना बळ देणारा व राज्याचा प्रादेशिक समतोल साधणारा अर्थसंकल्प असून, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेली महाराष्ट्राची घोडदौड अधिक दमदार होईल. मतदारांनी दाखवलेल्या अभूतपूर्व विश्वासाची जाणीव करून देणारा व महाराष्ट्राची सर्वांगीण आर्थिक प्रगती साधणारा आजचा अर्थसंकल्प अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सादर केला.
- राज्याच्या विकासचक्राला गती
शिक्षण, कृषि, मत्स्योद्योग, उद्योग, जलपर्यटन, ग्रामविकास, आदिवासी विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण सुरक्षा, जलसंधारण, विमानतळांचे आधुनिकीकरण, मेट्रो, रेल्वे, रस्ते वाहतुकीतून मोठा रोजगार मिळणार असून राज्याच्या विकासचक्राला गती व चालना मिळेल.
- 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज
मुख्यमंत्री बळीराजा योजनेत 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासह 27 जिल्ह्यांसाठी दिवसा वीज देण्याचा संकल्प तसेच पंतप्रधान सूर्यघर योजनेला बळकटी जनमानसावर दूरगामी परिणाम करणारा आहे.
- लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद
राज्यात नवीन गृहनिर्माण धोरण, लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याने जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्या विरोधकांची बोलती बंद झाली.
- आग्रा, संगमेश्वरात छत्रपतींचे स्मारक
छत्रपतींचे लखलखते शौर्य व प्रेरणादायी इतिहास सांगणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आग्र्यात तसेच, कोकणातील संगमेश्वर येथे धर्मवीर छ. संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा संकल्प अभिमान वाढविणारा आहे. नाशिक कुंभमेळा लक्षात घेता नमामि गोदावरी अभियान, अभिजात मराठी सप्ताह समाधान देणारे आहे.

