- दिव्यांगांच्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
णे, प्रतिनिधी – दिव्यांग मुलांच्या कलेला वाव देण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दिव्यांग आणि इतर विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दिव्यांग मुलांसाठी आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. तर 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे या भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेतून प्रत्येक गटातील सर्वोत्तम पाच बालचित्रकारांच्या चित्रांची निवड करण्यात आली. तिन्ही गटांतील पंधरा सर्वोत्कृष्ट बालचित्रकारांना न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या सभागृहात आयोजित पारितोषिक वितरण कार्यक्रमात पंधराशे रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डिकाईचे संस्थापक ध्यानमूर्ती रघुनाथ येमुल गुरुजी, बिव्हिजी ग्रुपचे संचालक हनुमंत गायकवाड, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर, सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ध्यानमूर्ती रघुनाथ येमुल गुरुजी म्हणाले की, दिव्यांगांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी सरकारने इंडस्ट्री सुरू करावी. सहज पद्धतीने तयार करता येणारे प्रॉडक्ट जसे की फिनेल निर्मिती अथवा सोप्यापद्धतीने बनविण्यात येणाऱ्या गोष्टी शासनाने दिव्यांगांकडून खरेदी कराव्यात त्यासाठी त्यांना विशेष तज्ञांकडून प्रशिक्षण देऊन त्यांचे जगणे सुलभ करावे. सार्वजनिक शौचालये अथवा शासकीय कार्यालयात स्वच्छतेसाठी लागणाऱ्या फिनेलची निर्मिती ‘डिकाई’तर्फे करून या माध्यमातून त्यांची आर्थिक उन्नती करणार आहे. दिव्यांगांना टाटा, अंबानी सारखे उद्योजक बनवायचे असतील तर शासनाबरोबर समाजातील चांगल्या लोकांनी एकत्र येत त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.
येमुल गुरुजी यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली ‘डिकाई’ ही संस्था असून, रघुनाथ गुरुजी यांच्या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक, आत्मिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत आहेत.
स्पर्धेच्या संयोजनासाठी डिकाईचे सेक्रेटरी शेखर यादव आणि रमणबाग प्रशालेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर कोष्टी यांनी केले त्याचबरोबर कार्यक्रमाचे संयोजन नाट्यकर्मी रवींद्र सातपुते व रमण बाग प्रशालेतील चित्रकला शिक्षिका श्रीमती अंजली मालुसरे यांनी केले. या सर्व कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुशीला प्रभूदेसाई व शाळा समिती अध्यक्ष डॉ. शरद आगर खेडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

