पहिला मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स सोहळा पुण्यात संपन्न
चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा ‘संगीतरत्न’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
पुणे, दि. ९ मार्च, २०२५: स्वतंत्र संगीताला चित्रपटांचा आधार नसतो, येथे कलाकार आपण कसे व्यक्त व्हायचे हे स्वत: ठरवतो. त्यामुळे मराठी मुक्त संगीताला स्टार्ट अप असल्यासारखे समजून त्याची सरकार दरबारी नोंद व्हावी आणि मराठी चित्रपटांना जसे अनुदान मिळते तसे अनुदान मराठी मुक्त संगीताला मिळावे अशी अपेक्षा सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी व्यक्त केली. संगीतकार अजय नाईक आणि कौस्तुभ दबडगे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र कलामंच व जस्ट कोलॅब यांच्या वतीने आयोजित पहिल्या मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स सोहळ्यात त्या बोलत होत्या.
एरंडवणे येथील शकुंतला शेट्टी सभागृहात संपन्न झालेल्या मराठी इंडी म्युझिक अवॉर्डस् (मिमा) सोहळ्यात चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यावेळी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या हस्ते ‘संगीतरत्न’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुक्त संगीतातील प्रयत्नांना सरकारी अनुदान मिळाले तर त्यांचा प्रसार जगभर होईल असा विश्वास व्यक्त करीत वैशाली सामंत म्हणाल्या, “आम्ही संगीतातील वेडे मुशाफिर आहोत. या पुरस्काराने आम्हा सर्वांनाच आज एक छोटासा किनारा मिळाला याचे समाधान आहे. आम्ही केलेल्या श्रमाला व्यासपीठ मिळतंय ही आश्वासक गोष्ट आहे.”
पुढचा मिमाचा सोहळा आपण मुंबईत करू आणि त्याला मुख्यमंत्र्यांना घेऊन यायची जबाबदारी माझी असे आश्वासन यावेळी प्रसाद लाड यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वदूर मराठीचे वातावरण आहे, या पार्श्वभूमीवर अशोक पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी मुक्त संगीताला अनुदान मिळावे यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे येत्या २० तारखेआधी आम्ही निवेदन देऊ.”
‘राधा ही बावरी’ या गाण्याच्या आठवणी सांगताना अशोक पत्की म्हणाले, “गाणे जन्माला आले तेव्हा त्याचे शब्द वेगळे होते. हे शब्द मला पटत नाहीयेत आणि तुम्ही गाणे लिहा असा मला स्वप्नील बांदोडकर यांचा फोन आला लागोलाग तो भेटायलाही आला. मी संगीतकार आहे गीतकार नाही हे मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने हट्टच धरला होता. शेवटी त्याच रात्री धून सुचली आणि गाणे लिहिले.” ‘राधा ही बावरी’ या गाण्याने मी गाणे लिहू शकतो असा मोठा धीर मला दिला असे अशोक पत्की मिश्कीलपणे म्हणाले.
आजकालच्या जमान्यात शिक्षण हे सगळीकडून सतत मिळत असते. पण संस्कार काही मिळत नाहित. आम्ही सर्वच दिग्गज कलाकारांनकडून संगीताचे शिक्षण घेतले. पण पत्की काकांनी आमच्यावर शिक्षणापेक्षा जास्त संस्कार केले. आज हेच संस्कार आमच्या सोबत आहेत. जे शिकलात ते पुढच्या पिढीला द्या हा यातलाच एक महत्त्वाचा संस्कार आहे, असे पुरस्काराला उत्तर देताना अवधूत गुप्ते म्हणाले.
आम्ही या क्षेत्रात २५ हून अधिक वर्षे आहोत मात्र मुक्त संगीतासाठी असा पुरस्कार नव्हता. चित्रपटेतर संगीतासाठी या निमित्ताने एक नवीन प्रवास सुरु होणार असून नव्या पिढीच्या संगीतकार व गीतकारांना याद्वारे नवी उमेद मिळेल, असे स्वप्नील बांदोडकर म्हणाले.
कार्यक्रमात प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांना ‘मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ पुरस्काराने गौरविले गेले. याबरोबरच पं रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि पं. संजीव अभ्यंकर यांना शास्त्रीय संगीत विभागात सर्वोत्कृष्ट गायक पुरस्काराने तर जीवन धर्माधिकारी आणि विवेक काजवेकर यांना संगीत संयोजन विभागासाठीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय पहिले आयकॉनिक मराठी इंडी सॉंग म्हणून ‘गारवा’ या गाण्यासाठी कवी सौमित्र आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांचा तर पहिला आयकॉनिक इंडी मराठी शो म्हणून ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमासाठी संगीतकार-गायक जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप खरे व सलील कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.
खान्देशी, अहिराणी, आगरी, कोळी, कोकणी, मालवणी या सर्व भाषांतील गाण्यांसोबतच मराठी मधील ‘पॉप’ संगीत भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा अनेक शैलींमध्ये गाण्यांना देखील विविध विभागांमध्ये मराठी इंडी म्युझिक अवॉर्डस् (मिमा) सोहळ्यामध्ये गौरविण्यात आले. आर जे राहुल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

