पुणे -महापालिका कार्यालयासमोर असणाऱ्या मेट्रो स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. स्त्रियांवर होणारे अत्याचार या विरोधात आणि मेट्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आंदोलक गपचूप मेट्रो स्थानकात पोहोचले. यानंतर ते थेट मेट्रो रुळावर उतरले. त्यांनी जवळपास एक तास निदर्शने देत मेट्रो वाहतूक रोखून धरली. रविवारचा दिवस असल्याने हजारो पुणेकर मेट्रोने प्रवास करतात. या पुणेकरांना जवळपास तासभर एकाच ठिकाणी स्थानबद्ध व्हावं लागलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. या आंदोलनासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. आंदोलकांनी मेट्रो रुळावर उतरुन आंदोलन केल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा मेट्रो स्थानकात दाखल झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. विशेष म्हणजे तुम्ही आम्हाला रुळावरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही खाली उड्या मारु, असा इशारा आंदोलकांनी दिला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांच्या सुरक्षेसाठी मेट्रो रुळाच्या खाली संरक्षण जाळ्या धरुण पोलीस जवानांना उभं केलं.
कोणताही परवानगी न घेता आंदोलकांनी थेट मेट्रो सेवा ठप्प केली. पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकणे, प्रशासनाला धमकावणे, सार्वजनिक वाहतूक बंद करणे असे प्रकार कोणत्याही स्तरावर खपवून घेतले जाणार नाहीत. गरज पडल्यास बळाचा वापर केला जाईल. अशा आंदोलकांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. -संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १
वाढती बेरोजगारी, शासकीय रुग्णालयातील भ्रष्टाचार, मोफत शिक्षण मागणी, राजकारणातील घराणेशाही बंद करणे,शिक्षणातील व्यावहारिक बाजार थांबवणे अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर शरद चंद्र पवार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मनपा मेट्रो स्थानकावर मेट्रो लाईन वर बसून आंदोलन केल्याचा प्रकार घडला.आत्मदहनाचा इशारा देत करण्यात आलेल्या या आंदोलनात पालकमंत्री येऊन येथे सांगू द्यात अशी भूमिका घेण्यात आली. यावेळी झालेल्या पोलीस आणि आंदोलक यांच्यातील बाचाबाचीतून आंदोलकांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्यासह उपनिरीक्षक, कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल फेकल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला .याप्रकरणी पोलिसांनी नरेंद्र पावटेकर याच्यासह ५ ते ६ पुरुष आणि १० महिलांवर विविध कलमांन्वये शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी अचानक कोणतीही परवानगी न घेता मेट्रो सेवा ठप्प केली. दोन तासापेक्षा अधिक वेळ मेट्रो सेवा यामुळे विस्कळीत झाली. पोलिसांना या आंदोलनाबाबत माहिती मिळताच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी मेट्रोच्या रूळावरच आंदोलन सुरू केल्याने, मेट्रो सेवा विस्कळीत झाली. कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते आणि शहर उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रथमच मेट्रोच्या लाईनवर हे आंदोलन करण्यात आले पण पावटेकर यांनी आंदोलन पक्षाची परवानगी न घेता केले आणि पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली असा त्यांच्यावर आरोप करत पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
जगताप म्हणाले, नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात व कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही.अशा परिस्थितीमध्ये आज त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्या आहे. निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्ह आहेत .आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, आणि एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही.त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेत आपल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री अगर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना जागेवर आणल्याशिवाय आपण उठणार नाही असा पवित्रा घेत, दीड तास मेट्रो सेवा ठप्प ठेवली. मेट्रो पुलावरून उडी मारण्याची धमकी दिल्याने अग्निशामक दलाच्या पथकाने यावेळी पुलाखाली जाळी धरत बचाव कार्यासाठी तयारी देखील केली. पोलिसांची या प्रकारामुळे धावपळ उडाली तसेच त्यांनी वारंवार विनंती करूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक यांनी पोलिस आणि माध्यमे यांच्यावर हात उचलण्याचा प्रकार घडला.अखेर पोलिसांनी सदर ठिकाणी शिरून आंदोलकांची धरपकड करत सदर आंदोलन मोडीत काढले.

