पुणे : महात्मा गांधींनी समर्पणातून आपल्याला स्वत:चा आवाज ऐकवला. आज बाहेरचा आवाज वाढला आहे. शोषित, पीडित, कष्टकरी, शेतकरी, महिला यांचा आपण आवाज झाला पाहिजे. हिंसेचे उत्तर अहिंसेनेच दिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी रविवारी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनातील तिसऱ्या दिवसाच्या सत्रात ‘ माझा आतला आवाज’ या विषयावर त्या बोलत होत्या. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) मुख्य सल्लागार विवेक सावंत, स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आणि एम. एस. जाधव यावेळी उपस्थित होते.

पाटकर म्हणाल्या, आपण आतला आवाज गांधींच्या प्रेरणेने ठरवतो तेव्हा तो जीवनप्रणाली आणि कार्यप्रणाली होतो. आज गांधींचा वारसा संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत असले तरी ते कधी यशस्वी होणार नाही कारण गांधी सत्ताधीश नव्हते. ते सत्यवादी होते. गांधींनी फाळणी केली असा आरोप केला जातो. गांधी विरुद्ध सावरकर, गांधी विरुद्ध भगतसिंग, गांधी विरुद्ध आंबेडकर असा वाद सत्ताधारी रंगवतात पण गांधींनी कधीच कोणाला शत्रू मानले नाही. वोट बँकेच्या काळात आपण आतला आवाज आणि गांधींचा आवाज ऐकू शकतो का ? इतिहास केवळ घटनाक्रम नाही तर तो प्रेरणेचा स्त्रोत असतो. गांधींचा वारसा टिकवण्याची आज गरज आहे. नदी, जल, जंगल वाचवण्यासाठी लढत आहेत, त्यांच्यामागे उभे राहिले पाहिजे. देशात विभाजनाचे राजकारण होत असताना आपण शोषित, पीडित, दलित, कष्टकरी, शेतकरी आणि महिलांचा लढा पुढे नेला पाहिजे.
सावंत म्हणाले, आतला आवाज सामान्य माणसालाही ऐकता येतो. त्यासाठी महात्मा असण्याची गरज नाही, असे गांधी सांगायचे. आतला आवाज ऐकण्यासाठी नैतिकता असणे गरजेचे आहे. आपण एकटे असतो आणि संकटात सोबत कोणी नसते, तेव्हा आतला आवाज मदतीला येतो. मी एमकेसीएलमध्ये काम करताना गडचिरोलीच्या आमच्या प्रशिक्षण केंद्रातील दोन चालकांमध्ये वाद झाला होता. त्यातील एकाने माझ्यावर अॅट्रोसिटीचा खटला दाखल केला. वास्तविक या वादाशी माझा संबंध नव्हता. मी मुंबईहून पुण्याला जात होतो. त्यावेळी ही बाब मी मंत्री आणि अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी मला गायब होण्याचा सल्ला दिला. मला आश्चर्य वाटले. मी नागपूर खंडपीठात माझी भूमिका मांडली. सहा वर्षांनी हा खटला संपला. निकाल माझ्या बाजूने लागला कारण बापू पाठीशी होते.
सप्तर्षी म्हणाले, माणसाचे समाजाशी कायमचे नाते जोडलेले असते. समाजातील विसंगती व्यक्तीमध्ये येतात. मी समाजाचे काम करणार नाही म्हणणारा माणूस अहंकारी असतो. माणूस समाजाशिवाय राहू शकू शकत नाही. आतला आवाज ऐकण्यासाठी लोकांच्या समस्या जाणून त्याचे निराकरण करता आले पाहिजे. लोकांचे दु:ख समजणे ही ईश्वर होण्याची प्रक्रिया आहे. मन निर्मळ असल्याशिवाय आतला आवाज ऐकू येत नाही. चारित्र्य आणि शील असेल तर आतला आवाज ऐकता येतो. प्रामाणिक होता म्हणून कोणी मरत नाही. प्रामाणिक होता म्हणून ईडी मागे लागत नाही. आतल्या आवाजाचा आनंद घेता आला पाहिजे.
स्वप्नील तोंडे यांनी सूत्रसंचालन केले. चिन्मय कदम याने आभार मानले.
आदिवासींमध्ये भांडणे लावली जात आहेत
खैरलांजी ते मणिपूर अशी सगळीकडे हिंसा सुरू आहे. देशात अहिंसा कुठे दिसते का ?
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झाला आहे. जमिनीखालील निसर्गाचा खजिना देत नाही म्हणून आदिवासींमध्ये भांडणे लावली जात आहेत, असे मेधा पाटकर यांनी सांगितले.

