पुणे : कला शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. कलेविषयीचे प्रेम, परिश्रमांची तयारी, गुरुंवरील निष्ठा आणि प्रयत्नांमधील सातत्य, यांच्या आधाराने व्यक्ती स्वतःमधील कलाकार घडवू शकतो याचा प्रत्यय देणाऱ्या प्रगल्भ सादरीकरणातून युवा आणि ज्येष्ठ कलाकरांनी रसिकांची दाद मिळवली.
गांधर्व महाविद्यालय आणि जयंत केजकर शिष्यवृंद आयोजित निरामय संगीत सोहळा रविवारी हॉटेल प्रेसिडेंट झाला. गायन, वादन आणि सहगायनाने ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
निरामय संगीत सोहळ्यात सुरवातीला उस्ताद बाले खाँ यांच्या शिष्या किशोरी कुलकर्णी यांचे सतारवादन झाले. त्यांनी राग अहिरभैरव मध्ये आलाप, जोड झाला या क्रमाने वादन केल्यानंतर तीन तालातील रचना सादर केली. त्यांना तबल्याची साथ महेश केंगार यांनी केली.
त्यानंतर डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी राग तोडी सादर केला. ‘दैय्या बट दुबर भयी’ हा विलंबित त्रिताल आणि जोडून द्रुत तीनतालात ‘मै तुमरी शरणागत प्यारी’ ही रचना ऐकवली. त्यांना श्रीपाद शिरवळकर (तबला), मयुरेश गाडगीळ (हार्मोनियम) तसेच विनय कोहाड व कन्हैया भोसले यांनी तानपुरा साथ केली.
त्यानंतर कन्हैया भोसले आणि विनय कोहाड या युवा कलाकरांचे सहगायन रंगले. त्यांनी राग भटियार मध्ये बडा ख्याल ‘बरनीन जाय’ (विलंबित त्रिताल), छोटा ख्याल ‘काहे को हमसंग करत’ (ताल त्रिताल) सादर केला. त्यांना श्रीपाद शिरवळकर (तबला), मयुरेश गाडगीळ (हार्मोनियम), तर कौस्तुभ लिमये व प्रद्युम्न नाडगौडा (तानपुरा) यांनी साथ केली.
कार्यक्रमात पुढे पं. प्रमोद मराठे यांचे संवादिनी वादन रंगले. त्यांनी सुरुवातीस राग किरवाणी सादर केला. तसेच पहाडी धून पेश केली. तबलासाथ अभिजीत जायदे यांनी केली. त्यांच्या संवादिनी वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाची सांगता जयंत केजकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग ललत मधील ‘अरे मन राम’, ‘जोगिया मोरे घर आये’ या रचना सादर केल्यानंतर राग लंकादहन सारंग मध्ये ‘चरणतक आये’ ही विलायत हुसेन खाँ यांची बंदिशी सादर केली. त्यांना अभिजीत जायदे (तबला), पं. प्रमोद मराठे (संवादिनी), कन्हैया भोसले आणि विनय कोहाड (तानपुरा) यांनी समर्पक साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मानसी अरकडी यांनी केले.
गांधर्व महाविद्यालय तसेच इंडियन डायबेटिक असोसिएशन या संस्थांना त्यांच्या कार्यानिमित्त डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी देणगी दिली. पं. प्रमोद मराठे आणि डॉ. भास्कर हर्षे यांनी देणगीचा स्वीकार केला. मनोगतात डॉ. प्रकाश कुलकर्णी म्हणाले, ‘मी वैद्यकीय क्षेत्रात कारकीर्द केली पण लहानपणापासूनच मला संगीत क्षेत्राची आवड होती. पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे माझे वडील संगीत शिकले होते. मी भूलतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील कार्यातून निवृत्त झाल्यानंतर संगीत कला शिकण्यास सुरुवात केली. आवाज साधनेचा अभ्यास केला.’
कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका मधुवंती देव, प्रसिद्ध गायक पुष्कर लेले, डॉ. विद्या गोखले, डॉ. अनुराधा कुलकर्णी, डॉ. प्रशांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. अरुण पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले.
गायन, वादनाने रंगला निरामय संगीत सोहळागांधर्व महाविद्यालय आणि जयंत केजकर शिष्यवृंदातर्फे आयोजन
Date: