ऋत्विक सेंटर आयोजित कार्यक्रमात व्यक्त झाले कलाकार
पुणे : कला हे अभिव्यक्तीचे माध्यम असते, त्यात भावना निर्माण होण्यासाठी ‘ती’चे अस्तित्व असावेच लागते. चित्रपट सृष्टीतील स्त्रीच्या प्रतिमेचा प्रवास अत्यंत निसरडा आहे. कारण हे माध्यम पुरुषांनी पुरुषांसाठी स्त्रीयांना वापरून निर्माण केले आहे. चित्रकलेच्या माध्यमातून स्त्रीरूप साकारताना तिच्याकडे ‘ऑब्जेक्ट’-‘प्रॉडक्ट’ म्हणूनच पाहिले जाते. परंतु चित्रकाराची स्त्रीकडे पाहण्याची नजर दैनंदिन व्यवहारात जशी स्त्री दिसते तशी असावी. नृत्याच्या क्षेत्रात स्त्रीने पुरुषाची नजर मान्य केली आहे, असे दिसते. कलाकार स्त्री असली तरी नृत्याद्वारे व्यक्त होणाऱ्या भावना पुरुषाच्या लेखणीतूनच उमटल्या आहेत, असा सूर ‘कलाकारांच्या नजरेतून ती’ या परिसंवादात उमटला.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ऋत्विक सेंटरतर्फे विविध क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आणि त्यांच्या कलेतील ‘ती’ या अनोख्या संकल्पनेवर विशेष कार्यक्रमाचे कोथरूडमधील ऋत्विक सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर, प्रसिद्ध चित्रकार राजू सुतार, भरतनाट्यम नृत्य कलाकार डॉ. परिमल फडके यांचा सहभाग होता. त्यांच्याशी पॉडकास्टर सौमित्र पोटे यांनी संवाद साधला. या निमित्ताने प्रख्यात चित्रकार प्रसाद भारद्वाज यांच्या अमूर्त चित्रकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
सुनील सुकथनकर म्हणाले, आपल्या समाजावर चित्रपट सृष्टीचा मोठा प्रभाव दिसून येतो. या माध्यमातून स्त्री नेहमीच पुरुषाला बघायला आवडेल तशीच दाखविली जाते. बाईला रडविणे आणि पुरुषाला हसवीणे हीच चित्रपटांची प्रतिमा निर्माण झाली आहे. समांतर चित्रपटाच्या माध्यमातून स्त्रीची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न घडत आहे. आजच्या चित्रपटांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचा आभास होतो, परंतु तो परिपूर्ण वाटत नाही. आज चित्रपट क्षेत्रातील तांत्रिक विभागात स्त्रियांचा सहभाग कमी जाणवतो. स्त्रीने स्त्रीप्रधान चित्रपटाची निर्मिती करणे ही चौकट मोडल्यास आजच्या चित्रपट सृष्टीचे चित्र बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजू सुतार म्हणाले, पूर्वीच्या काळी चित्रकलेच्या विश्वात पुरुष कलाकारांचे वर्चस्व असल्याने ते स्त्रीच्या शरीरापलिकडे कधीच गेले नाहीत. या क्षेत्रात आज ‘डिमांड तसा सप्लाय’ अशी परिस्थिती आहे. आजचे चित्रकलेचे मार्केट इन्व्हेस्टरचे आहे. या क्षेत्रात कलाकाराने वाट बदलल्यास नवनिर्मिती होऊ शकते. आज शाळांमध्ये कला या विषयाला दुय्यम स्थान आहे. तसेच कला महाविद्यालयांमध्ये कलेचे व्याकरण शिकता येते पण कलाकाराच्या प्रतिभेला, विचारांना वाव मिळत नाही. आपल्या समाजाकडे आर्ट गॅलरी पाहण्याची नजरच नाही. आज चित्रकलेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्त्री कलाकार कार्यरत असूनही प्रगतीशील काम होताना दिसत नाही.
डॉ. परिमल फडके म्हणाले, नृत्य या कलाक्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण खूप असले तरी तिच्या भावना, अवस्था यांचे वर्गीकरण पुरुषांनीच केल्याचे जाणवते. नृत्य करणारी स्त्री आणि पाहणारा तो ही परिस्थिती असल्याने नृत्य कलेवरही पुरुषी वर्चस्वाचा पगडा जाणवतो. गेल्या काही वर्षांत नृत्य पाहणाऱ्या स्त्रिया आणि त्या विषयी विचार करणाऱ्या स्त्रिया यांची संख्या वाढल्याने आज नृत्य क्षेत्रामध्ये वैविध्य निर्माण होताना दिसते. नृत्याचे पारंपरिक व्याकरण सोडून आजची ‘ती’ नवे व्याकरण निर्माण करू पाहते आहे. विविध नृत्य शैलीतील नृत्यांगना एकत्र येऊन नवे काही मांडू पाहत आहेत.
स्त्रीचे अधिकार कवितेतून मांडले : वैभव जोशी
‘कवीला उमगलेली ती’ या विषयी बोलताना प्रसिद्ध कवी वैभव जोशी म्हणाले, मी पुरुषसत्ताक घरातूनच आलो आहे. लहानपणी निरागसपणे पडलेल्या स्त्री-पुरुष भेदाच्या प्रश्नांना मला कधीच समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. पुरुषसत्ताक वातावरण मी झुगारले. त्यातून रूपकात्मक स्त्रीचे अधिकार माझ्या कवितेतून मांडले गेले. वैभव जोशी यांच्या कवितेत अष्टनायिका सापडतात का या संकल्पनेतून समिरा गुजर-जोशी यांनी वैभव यांना बोलते केले. विंदा करंदीकर, ना. घ. देशपांडे, बा. भ. बोरकर, सुरेश भट यांच्या कविता या प्रसंगी सादर करण्यात आल्या. कलह करणारी, विरहात बुडालेली, धाडसी आणि मातृत्व दर्शविणाऱ्या स्त्रीयांचे रूप वैभव जोशी आणि समिरा गुजर-जोशी यांनी उलगडले. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांना भरभरून दाद दिली.
कलाकारांचा सत्कार ऋत्विक सेंटरचे संचालक प्रकाश गुरव यांनी केला. तर सूत्रसंचालन अरविंद देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना चित्रकार प्रसाद भारद्वाज यांची होती.