पुणे, दि.८: पुणे जिल्हा परिषद आणि शासकीय कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “फुले कृषी सावित्री जत्रा” या विशेष उपक्रमाला खासदार सुनेत्रा पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती पवार यांच्या हस्ते १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांतील १ लाख २ हजार महिलांना सायबर सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
उमेद अभियानांतर्गत महिलांना उद्योगधंद्यांसाठी व विविध उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक यांच्या मार्फत ₹१९ कोटी ६ लाख ३० हजारांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, या कर्जाच्या धनादेशांचे वाटप खासदार श्रीमती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत “लखपती दीदी”, “ड्रोन दीदी” आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना यावेळी विशेष सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील उमेद प्रेरित स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमात महिलांसाठी “खेळ पैठणीचा”, तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मंगळागौर, भारूड अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पाटील यांनी केले तर श्रीमती कडू यांनी आभार मानले.