लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे- रामदास आठवले

Date:

पुणे: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने पूर्ण करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

आपल्या पुणे दौऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, विरेन साठे  वसीम पैलवान, संदीप धांडोरे, रोहित कांबळे, हबीब सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर काहीसा ताण येत असला तरी देखील राज्य सरकारने तो ताण सहन करूनही लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन पाळावे, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.

चालू आर्थिक वर्षाच्या आर्थिक अहवालानुसार राज्याच्या महसुली उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याचे दिसून येत आहे. मात्र, येणाऱ्या काळात राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दावोस येथे विविध उद्योगांशी झालेल्या करारानुसार राज्यात 15 लाख 90 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. त्याचप्रमाणे इतर काही उपाययोजना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळ राज्याच्या आर्थिक परिस्थितीत नक्कीच सुधारणा करेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले आहेत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यात तणाव असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. प्रत्यक्षात शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आणि सध्याच्या फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे चर्चा करून कोणताही निर्णय घेत असतात. त्यामुळे काही निर्णय रद्द केले असले तरी देखील त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चा झालेली असणार आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात तणाव असल्याचे वृत्त चुकीचे आहे, असा दावाही आठवले यांनी केला.

अनेक पक्षांचे सरकार चालविताना एकमेकांमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे. याचा अर्थ महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर नाराज आहेत असा होत नाही. रिपब्लिकन पक्षामध्ये देखील मंत्रीपद न मिळाल्यामुळे काही प्रमाणात अस्वस्थता आहे. मात्र, महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येण्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनतेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा मिळणे आवश्यक आहे. विशेषत: पुण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी जनता वास्तव्य करीत आहे. त्यामुळे पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी मागणी ही त्यांनी केली.

पुण्यात भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे

पुणे रेल्वे स्थानकाजवळ आंबेडकर भवनच्या मागे दोन एकरचा भूखंड रिकामा आहे. या जागेवर भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे, अशी आपली मागणी असून त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. ही जागा कर्करोग रुग्णालयासाठी मागितली जात असली तरी देखील रुग्णालयासाठी इतर जागा निवडण्यात यावी. आपला विरोध रुग्णालयाच्या उभारणीला नाही. रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. मात्र, आंबेडकर भवन नजीकच्या जागेवर भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे, असा आपला आग्रह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महागया येथील महाबोधी ट्रस्टमध्ये सन 1949 च्या कायद्यानुसार हिंदू धर्मातील काही जणांना प्रतिनिधित्व देण्याचा नियम आहे. मात्र, इतर कोणत्याही धार्मिक ट्रस्टमध्ये इतर धर्माच्या प्रतिनिधींचा समावेश केला जात नाही. त्याप्रमाणेच महाबोधी ट्रस्टही पूर्णपणे बौद्ध समाजातील विश्वस्तांकडे दिला जावा, अशी मागणी आहे. या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू आहे. रिपब्लिकन पक्ष देखील 10 ते 19 मार्च दरम्यान राज्यातील सर्व जिल्हे तालुके आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये या मागणीसाठी आंदोलन करणार आहे. या मागणीचे कोणीही राजकारण करण्याची गरज नाही, असेही आठवले यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव विजय स्मारकासाठी दीडशे ते दोनशे एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र, त्यासाठीच्या प्रक्रियेने अद्याप वेग घेतलेला नाही. यासाठी देखील आपण मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्मारकाचा आराखडा जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय अधिकारी यांनी तयार करून तो लवकरात लवकर राज्य शासनाला सादर करावा, अशी सूचनाही आठवले यांनी केली.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील सर्वात उंच पुतळा हिंदू मिल स्मारकात उभारण्यात येणार आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे या पुतळ्याचे काम करत असून या
कामासाठी 1हजार 89 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दीड वर्षाच्या कालावधीत हा पुतळा पूर्णपणे तयार होईल, अशी माहिती आठवले यांनी दिली.

आंतरजातीय विवाह केल्याप्रकरणी भोर येथील विक्रम गायकवाड या तरुणाची हत्या झाली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, हे कृत्य एकट्या दुकट्याचे नसून यात आणखी काही आरोपी सहभागी असावेत, असा आमचा संशय आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली असून त्यांनी कसून तपास करण्याचे आश्वासन दिले आहे, असे आठवले यांनी सांगितले.

संघटना वाढीवर लक्ष केंद्रित

रिपब्लिकन पक्षाने संघटन बांधणी आणि वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने 9 एप्रिल रोजी लोणावळा येथे राज्यभरातील 800 ते 1000 महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 18 मे रोजी सामाजिक सलोखा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात समाजातील सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी विचारमंथन केले जाणार आहे, असे आठवले म्हणाले. त्याचप्रमाणे ठाणे येथे एक जून रोजी पक्षाचे अधिवेशन होणार असून त्यात सुमारे एक लाख कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावाही त्यांनी केला

महामानवांचा आव्हान करणारी आणि समाजात फूट पाडणारी वक्तव्य करणे अयोग्य असून त्याबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील आठवले यांनी केली. ‘कोण नामदेव ढसाळ,’ असा उन्मत्त सवाल करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, चौकशी अंती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आठवले यांनी दिली.

मोदींना घालवणे राहुल गांधी यांना शक्य नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. महायुतीला राज्यात आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशभरात जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मोदी यांना हटविणे राहुल गांधी यांना शक्य होणार नाही. केंद्रात इंडी आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी सपशेल तोंडघशी पडली आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर देखील पंतप्रधान पदावर मोदी हेच विराजमान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महिलांवर वाढणाऱ्या अत्याचार आणि अवमानाच्या प्रकरणांचा आठवले यांनी तीव्र निषेध केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व ठिकाणी पुरुषांनी महिलांचा सन्मान राखावा हे कर्तव्यच – मंत्री चंद्रकांतदादा पाटील.

सौ. मंजुश्री खर्डेकर यांना ओवाळून चंद्रकांतदादांनी पाडला नवीन पायंडा जागतिक...

त्यांच्या कला-साहित्यातून उलगडली ‌‘ती‌’

ऋत्विक सेंटर आयोजित कार्यक्रमात व्यक्त झाले कलाकार पुणे : कला...

महिलांत अशक्य ते शक्य करण्याचे ताकद-डाॅ.प्रिती पाडपांडेः

'एमआयटी एडीटी'त कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण पुणेः महिला आता कुठल्याही क्षेत्रात...