डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे प्रकाशन
पुणे : महिलांच्या सक्षमीकरणासाठी गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या साहित्यकृतीच्या माध्यमातून लोकशिक्षण आणि जनजागृती घडत आहे. समाजाचा स्त्री जन्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होणे हे या कार्याचे फलित आहे, असे गौरवोद्गार भाजपा महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी काढले.
बेटी बचाओ अभियानाच्या प्रणेत्या आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा कांकरिया लिखित ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे प्रकाशन आज (दि. 8) खासदार कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. मानकन्हैय्या ट्रस्टतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, यशोवाणीच्या प्राची गुर्जर, अखिल भारतीय महिला जैन कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा विमल बाफना, मानकन्हैय्या ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया, कवी चंद्रकांत पालवे, भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलूलकर मंचावर होते. ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या पुस्तकाच्या ऑडिओ सीडीचे प्रकाशनही या प्रसंगी झाले.
लेखनाविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या, मला लहानपणापासूनच लेखन, वाचनाची आवड होती. त्यासाठी घरात पोषक वातावरणही होते. आई ग्रंथपाल आणि वडिल पत्रकार असल्याने साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा सहवास व आशीर्वादही लाभला. यातून रुजलेले बीज चळवळ रूपाने लेखनात परावर्तीत झाले. आरोग्य पत्रिकेतून लिहिलेले अनेक लेख, कविता, नाटिका, स्त्रीविषयक कायद्यांची माहिती याचे पुस्तकात रुपांतर झाले. सासरी देखील या कार्याला प्रेरणा मिळत गेली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साहित्य शारदेच्या मंदिरात ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचे प्रकाशन होत आहे हा माझ्यासाठी अमृतसिद्धी योग आहे.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या, सनातन भारतीय संस्कृतीत स्त्री जिद्दी, स्वतंत्र आणि ज्ञानवंत होती. तिला ब्रह्मचारिणी राहण्याचा, पती निवडण्याचा अधिकार होता. परंतु मध्ययुगात परकीय आक्रमणांमुळे सामाजिक व धार्मिक परिस्थिती स्त्री स्वातंत्र्यासाठी पोषक नव्हती. याविषयी साहित्यिकांनी संशोधन करून समाजाची आजची मानसिकता बदलण्यासाठी साहित्यकृतींची निर्मिती करावी.
डॉक्टर कुटुंबाकडून समाजभानाची जपणूक : प्रा. मिलिंद जोशी
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, डॉ. सुधा कांकरिया यांनी या पुस्तकाच्या निर्मितीतून समाजमनाला सावरण्याचे काम केले आहे. आजच्या प्रगत, समृद्ध सामाजिक परिस्थितीत किळसवाणे वैचारिक दारिद्य्र असताना ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या पुस्तकाच्या माध्यमातून समाजमन बदलण्याचे मौलिक कार्य डॉ. सुधा कांकरिया करीत आहेत. कांकरिया कुटुंबियांनी फक्त नेत्रचिकित्सेच्या क्षेत्रात योगदान दिलेले नाही तर समाजाला वेगळी दृष्टी देण्याचेही कार्य केले आहे. समाज परिवर्तनासाठी शब्दांचे शस्त्र होऊन सामर्थ्यवान ठरणाऱ्या साहित्यकृती निर्माण करणाऱ्या डॉ. सुधा कांकरिया या सर्जनशील लेखिका आहेत, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. संवेदनशीलता बोथट होऊन अश्रू आटणे ही आजची सामाजिक विकृत मानसिकता झाली आहे. अशा काळात संवेदनशील मनाचे हे डॉक्टर कुटुंब समाजभान जागृत ठेवून कार्यरत आहेत.
डॉ. सुधा कांकरिया यांच्या कार्याची लोकचळवळ झाली आहे, असे सुनिताराजे पवार यांनी सांगितले. दृष्टीहिन विद्यार्थ्यांना अवांतर वाचनातून बहुश्रुतता येण्यासाठी ओडिओ सीडीची निर्मिती केली आहे, असे यशोवाणीच्या प्राची गुर्जर यांनी सांगितले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास कुंदनऋषीजी महाराज साहेब, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अण्णा हजारे, आदिती तटकरे, राम शिंदे, डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन विमल बाफना, डॉ. वर्धमान कांकरिया, डॉ. श्रुतिका कांकरिया यांनी केले.
प्रास्ताविकपर स्वागत डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केले. सुरुवातीस श्लोका वर्धमान कांकरिया हिने सरस्वती वंदना नृत्य सादर केले तर स्मीरा वर्धमान कांकरिया हिने डॉ. सुधा कांकरिया यांची ‘गोड मुलगी गोडुली’ ही कविता सादर केली. उपस्थितांचे स्वागत डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केले. सूत्रसंचालन नेहा अभिजित यांनी केले तर आभार जयंत येलूलकर यांनी मानले.