पुणे-पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू घेण्यास सुरुवात झाली आहे.
पुण्यातील सिग्नलवरती गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर देखील या तरुणांनी अश्लील कृत्य केले आहे. पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकातील ही संतापजनक घटना आहे. व्हिडिओ काढण्यापेक्षा पोलिसांना बोलवत जाब विचारायला हवा. या विकृतांना ठेचून काढले पाहिजे, असे रुपाली ठोबरे यांनी म्हटले आहे.
पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकात एक BMW कार उभी करत मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने लघुशंका केली. यानंतर एका व्यक्तीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यासमोर अश्लील कृत्य केले. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यात महिला दिनाच्या दिवशी भररस्त्यात असा श्रीमंत बापाच्या मुलाचे संतापजनक कृत्य समोर आले आहे.
मागील घटनेतून पुणे पोलिसांनी धडा घेतला नाही
सुषमा अंधारे म्हणाल्या की, हा अत्यंत चिंताजनक प्रकार आहे. कारण ज्या परिसरात ही घटना घडली तो सर्व परिसर हा आयटी क्षेत्राचा आहे. त्या मार्गावर अनेक महिला मुलीची वर्दळ असते. याच रस्त्यावर काही दिवसांपूर्वी एका आयटी क्षेत्रातील मुलीवर चाकूने वार झाले आणि त्यात तिचा जीव गेला. मागील घटनेपासून पोलिसांनी काहीच धडा घेतलेला नाही, असे दिसून येत आहे.
तासाभरात कारवाई करा- दमानिया
अंजली दमानिया म्हणाल्या की, पोलिसांनी तर सोडा लोकांनीही धडे घेतलेले नाही. लोकांना महाराष्ट्राची परिस्थिती दिसत आहे. हा मोठ्या गाडीतून उतरला आहे. काय बोलावे अशा लोकांना. त्यांच्यावर तासाभरात कारवाई करण्याची गरज आहे. पोलिसांनी आता थोडेसे सक्रीय होण्याची गरज आहे. पोर्शेमध्ये जसा निबंध लिहण्यास सांगितले तसेच काहीसे याच्या बाबतीत होईल.
व्हिडिओ न करता चोप द्यावा- मोरे
वसंत मोरे म्हणाले की, स्वारगेट परिसरात हा प्रकार घडला आहे. पोलिस यंत्रणेवर प्रयन चिन्ह उपस्थित होत आहे. ते चौकात गाड्या थांबवतात, काळ्या काचा, नंबर यासाठी थांबवणाऱ्या पोलिसांना हे दिसत नाही का? असा सवाल मोरेंनी केला आहे. पुणे शहराचे वातावरण खराब झाले आहे. पोलिस कुणाकडे लक्ष द्यायला तयार नाही. प्रत्येकाला 31 मार्चचे टार्गेट आहे. त्यामुळे ह्याकडे कुणाचे लक्ष नाही. तिथल्या पोलिस चौकीचे कर्मचारी काय करता असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमच्यासमोर आले तर आम्ही त्यांना तिथेच राइट करू. लोकं व्हिडिओ करतात तसे न करता त्यांना तिथेच चोप दिला पाहिजे.
पोलिसांना दोष देणं योग्य नाही
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, 40-50 गावे पुणे शहरात समाविष्ट झाली आहेत. पोलिसांची देखील ग्रामीण आणि शहरी भागातील संख्या कमी आहे, प्रत्येक गोष्टीचा दोष पोलिसांवर टाकणे योग्य नाही. त्या तरुणावर कारवाई झाली पाहिजे. कडक कारवाईच्या सूचना मी सरकारला करणार आहे. गृह विभाग परिवहन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग या सर्वांनी मिळून या संदर्भात एक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.
लोकांची विकृती वाढली- रुपाली पाटील
विद्येचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात गुन्हेगारी लोकांची विकृती वाढली आहे. बीएमडब्ल्यू सारख्या गाडीतून उतरुन रस्त्यावर बाथरुम करतोय, किती निर्लज्ज आहे. यांना संस्कार नावाची गोष्टच नाही. एवढाच पैशांचा माज असेल, तर हॉटेलमध्ये जाऊ शकला असता, पाच रुपयांऐवजी शंभर रुपये देऊन लघुशंका केली असती, असे रुपाली पाटील म्हणाल्या.