मस्साजोग/मुंबई, दि. ८ मार्च २०२५
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, ज्या क्रूरतेने, अमानुषपणे ही हत्या करण्यात आली ते पाहून समाजाला चिंतन करावे लागेल. महाराष्ट्राला शिव, शाहू, फुले, आंबेडकर, या महापुरुषांचा गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यांच्याराख्या महान संताचा वारसा लाभलेला आहे. संतोष देशमुख यांचा बळी एका प्रवृत्तीमुळे गेला आहे. ही लढाई एकट्या देशमुख कुटुंबाची नाही तर सर्वांना ही लढाई लढावी लागणार आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, क्रुरता नष्ट व्हावी, मानवता व सद्भाव वाढावा हा संकल्प घेऊन ही सद्भावना पद यात्रा आयोजित करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रांताध्यक्ष यांनी सकाळी स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मस्सोजोग येथून सद्भावना यात्रेची सुरुवात केली. यावेळी सद्भावना यात्रेबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या बलिदानातून आपण काय शिकणार आहोत की नाही? एका प्रवृत्तीच्या विरोधात लढताना त्यांचा बळी गेला आहे आणि ही प्रवृत्ती नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलला पाहिजे. सद्भावना ही आपल्या भारताच्या डीएनएमध्ये आहे, संविधानात आहे व आम्ही या विचाराचे पाईक आहोत. घटना घडल्यापासून देशमुख कटुंबियांचा तोल ढललेला नाही, त्यांनी विवेकपूर्ण विचार मांडला आहे. गुन्हेगारांना जात, धर्म नसतो, तो गुन्हेगार असतो, या प्रवृत्तीच्या मागे कोण आहे, याचा उहापोह होत आहे मात्र ही सद्भावना जनतेपुढे घेऊन गेले पाहिजे.
सद्भावनेच्या विरोधात तोडाफोडा, भय, द्वेष, मत्सर, जाती धर्माला एकमेकाविरोधात लढण्यास लावणाऱ्या प्रवृती आहेत, अशा प्रवृत्तीचा आम्ही धिक्कार करतो. संस्कृती रक्षणाच्या माध्यमातून ही पदयात्रा आहे. देशमुख परिवाराच्या संघर्षासोबत आम्ही आहोत. संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी घटना पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये तसेच हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. या बलिदानातून आपण धडा शिकला पाहिजे, पैशाच्या हव्यासातून अशा हत्या होऊ नयेत असेही सपकाळ म्हणाले.
जातीभेद मिटवूया मानवता जपूया अशा घोषणा देत हजारोंच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हिमाचलच्या प्रभारी रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, नांदेडचे खा. रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष राहुल सोनावणे,ज्येष्ठ अर्थतज्ञ एम. एच. देसरडा, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील युवा नेते अजिंक्य पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र ऊर्फ आबा दळवी, अमर खानापूरे, दादासाहेब मुंडे, भगवानगडाचे विश्वस्त आणि जालना जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्यासह प्रदेश काँग्रेस व बीड जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते महिला तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो नागरिक सद्भावना रॅलीत सहभागी झाले होते.
मस्साजोग येथून सुरु झालेली पदयात्रा पुढे उत्तरेश्वर पिंप्री फाटा, पिंपळगाव फाटा, सांगवी, सारणी, रेणु पेट्रोल पंप, बरड, नांदूरफाटा, येळंबघाट, चाकरवाडी फाटा, नेकनूर असा प्रवास करत रात्रीचा मुक्काम नेकनूर येथे करेल. उद्या रविवार दि.९ मार्च रोजी पुन्हा या पदयात्रेची सुरुवात होऊन बीड शहरात सद्भावना मेळाव्याने यात्रेची सांगता होईल.