मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात (ता. ७) आमदार बापूसाहेब पठारे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मुळा-मुठा नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न उपस्थित करत उपाययोजना करण्याची मागणी केली. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून थेट नदीपात्रात सांडपाणी सोडले जात आहे. औद्योगिक वसाहतीतून निघणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदीतील हे पाणी शेतीसाठी अयोग्य आहे व त्यामुळे शेती नापिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, या पाण्यामुळे येणारी पिके मानवी आरोग्यास धोका निर्माण करणारी आहेत.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून सोडले जाणारे सांडपाणी महापालिकेच्या शुद्धीकरण प्रकल्पातून प्रक्रिया करूनच नदीत सोडणे, औद्योगिक वसाहतीतून नदीत सोडले जाणारे पाणीही शुद्ध करूनच सोडणे फार महत्त्वाचे आहे. महापालिकेने उभारलेले सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहिले पाहिजेत. मात्र, हे प्रकल्प दिवसा सुरू ठेवून रात्रीच्या वेळी बंद करून थेट नदीत प्रदूषित पाणी सोडण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी पठारे यांनी केली.
पठारे यांच्या मागणीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. तसेच, संबधित ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले आहे.

