मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई या ठिकाणी सुरू आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी, पुरवणी मागण्यांवरील चर्चेत वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे यांनी शासन दरबारी विविध मागण्या सादर केल्या.
यात प्रामुख्याने, पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा उर्वरित २५ टक्के बीआरटी मार्ग हटवण्याची ठोस मागणी पठारे यांनी केली. बीआरटी मार्गामुळे या भागातील अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना वाहतुकीच्या मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बीआरटीमधील नियोजनाच्या त्रुटींमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होताना पाहायला मिळत आहे. या समस्येचा कायमस्वरूपी उपाय म्हणून बीआरटी मार्ग त्वरित हटवावा, अशी ठाम भूमिका आमदार पठारे यांनी विधानसभेत मांडली. सोबतच, शासनाकडे यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
या व्यतिरिक्त पठारे यांनी महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील आरोग्य केंद्रे, उपकेंद्रेही पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावी , ससुनच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू व्हावे. त्यात आणखी दोन मजले वाढवण्यात यावे, जेणेकरून १५० बेड्सची संख्या वाढेल व यासाठीही निधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील महिला भगिनींसाठी चर्चेसाठी अस्मिता भवनसारखे हॉल तसेच सांस्कृतिक भवन बांधण्यात यावेत, ताथवडे येथे असलेल्या १०० एकर सरकारी जागेवर मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहाच्या धर्तीवर विश्राम गृह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात यावे, ‘खराडी-मांजरी-कोलवडी खुर्द-श्री क्षेत्र थेऊर’ या नवीन मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच श्री क्षेत्र लोहगाव – निरगुडी येथून श्री क्षेत्र आळंदीला जोडणारा रस्ता करावा. इ. मागण्या मांडल्या.

