मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी HSRP नंबरप्लेटसाठी महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत तिप्पट दर आकारण्यात येत असल्याची विरोधकांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली. विरोधक या प्रकरणी जनतेची दिशाभूल करत असून, राज्यात हे दर इतर राज्यांच्या तुलनेत फार कमी आहेत असे ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी इतर राज्यामध्ये या नंबरप्लेटसाठी आकारण्यात येणाऱ्या पैशांची आकडेवारीही सादर केली.देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले की, विरोधकांनी सरकारवर टीका करताना गुजरातची प्रशंसा करणे सोडून द्यावे. त्यांनी सरकारला उद्योगांना पुरक असणारी टीका करावी. आपल्या राज्याच्या अचिव्हमेंटचा स्वाभिमान हा सर्वांमध्ये दिसला पाहिजे अशी माझी विनंती आहे. ते म्हणाले, विरोधक एचएसआरपी नंबरप्लेटचे दर महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचा नरेटिव्ह पसरवत आहेत.
खरे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार आपल्याला हे यापूर्वीच करायचे होते. पण शेवटी कंटेम्प्ट झाला आणि त्यानंतर आपण हे केले. या प्रकरणी आपण मुख्य सचिवांच्या नेतृत्वात एक हायपॉवर समिती तयार केली होती. त्यात काही सचिवही होते. या सर्वांनी मिळून जे काही रेट आले होते, त्यात निगोशिएट तथा इतर राज्यांच्या रेटशी तुलना करून आपले रेट फायनल केले.
यासंबंधी आपण पाहिले तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस व प्लेट चार्जेस हे वेगळे दाखवलेत. पण महाराष्ट्रात आपण हे सर्व एकत्रित दाखवले आहे. त्यानुसार दुचाकीच्या नंबरप्लेटसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये 420 पासून 480 रुपयांचे शुल्क आहे. पण महाराष्ट्रात ते केवळ 450 एवढे आहे. तीनचाकींसाठी इतर राज्यांत 450 ते 550 रुपये शुल्क द्यावे लागते. पण महाराष्ट्रात ते केवळ 500 रुपये आहे. इतर राज्यांत चारचाकीच्या नंबरप्लेटसाठी 800 रुपये मोजावे लागता. पण आपल्याकडे हे दर 745 रुपये आहेत. जड वाहनांच्या नंबरप्लेटसाठी इतर राज्यांत 690 ते 800 रुपये दर आहे. पण आपल्याकडे तो केवळ 745 एवढा आहे, असे फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी मुद्दाम काही राज्यांच्या पावत्या आणल्या आहेत. त्यानुसार गोव्यामध्ये मूळ किंमत 315 रुपये, फिटमेंट चार्जेस 100 रुपये, कन्व्हेएन्स फी 50 रुपये व जीएसटी 83 रुपये असे एकूण 548 रुपये मोजावे लागतात. चंदीगडमध्येही मूळ किंमत 315 व इतर चार्जेस धरून 549 रुपये होतात. पण महाराष्ट्राचे एकूण चार्जेस 531 रुपये होतात. त्यामुळे महाराष्ट्रात जास्त दर आकारण्यात आल्याची टीका व्यर्थ आहे.
या प्रकरणी एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन दाखवले. त्यात त्यांनी 1200 ते 1300 रुपये दर असल्याचे दाखवले. पण संबंधितांवर छापा पडल्यानंतर तो अधिकृत एजंट नसल्याचे निष्पन्न झाले. सदर व्यक्ती एचएसआरपीचा डिलरही नव्हता. तो जुनी नंबरप्लेट विकणारा होता. त्यानंतर आम्ही संबंधित वाहिनीला चारवेळा हे सत्य दाखवण्याची विनंती केली. पण त्यांनी ते दाखवले नाही, असे फडणवीस म्हणाले.

