पुणे-(Legislative Council Elections)राज्यात विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्यात. ही निवडणूक विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये भाजप तीन, शिवसेना एक आणि अजित पवार राष्ट्रवादी एक अशा पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
पुण्यातील दोन नेते सुद्धा विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी दावेदार आहेत .अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी दावा केला आहे . मागील विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी सुद्धा मानकर यांनी संधी मिळावी, म्हणून वरिष्ठांकडे मागणी केली होती. त्यांची संधी डावलल्यानंतर मानकरांनी थेट राजीनामा दिला होता. परंतु त्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी मानकरांची समजूत काढली होती. त्यामुळे यावेळी मानकरांना संधी देण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना सु्द्धा विधान परिषदेची उमेदवारी मिळणार, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जातेय. त्यामुळे आता त्यांना उमेदवारी दिली जाण्याचा दाट अंदाज आहे. त्यामुळे आता पुण्याला दोन आमदार मिळणार काय ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.दीपक मानकर म्हणाले की, मी विधान परिषदेच्या आमदार पदासाठी पक्षाकडे दावा केलाय. अजित पवार हे योग्य निर्णय घेतील. काम करणाऱ्या माणसाच्या पक्ष हा उभा असतो. अजित पवार जो निर्णय घेतील, तो मला मान्य असतो. त्यांनी संधी दिली नाही तरी मी अजित पवारांसोबतच राहणार, असं देखील दीपक मानकर यांनी स्पष्ट केलंय.

