पुणे : ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयात 2350 पदे मंजूर आहेत. पण त्यातील 769 पदे ही रिक्त आहेत. तसेच 156 नसिंगची पद रिक्त आहेत. म्हणजे वर्ग चारची 50 टक्के पद रिक्त आहेत. ही पदभरती टीसीएस द्वारा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते. अनेकवेळा यापूर्वी देखील यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात यासाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी हलचाली केल्या जातील, तसेच वर्ग एक ची 44 आणि वर्ग दोन ची 110 रिक्त पदे तत्काळ भरली जातील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 दरम्यान आज विधानसभेत आमदार सिद्धार्थ शिरोळे,आमदार भीमराव तापाकिर , आमदार हेमंत रासने, आमदार शरद सोनवणे, आणि आमदार विक्रम पाचपुते, सुनील कांबळे यांनी ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालया संबंधीत लक्षवेधी प्रश्न मांडला होता. या प्रश्नांना उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे जेथे पुणे, पिंपरी-चिंचवड सह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येत असतात. वर्षाला साडे पाच लाख बाह्यरुग्ण येथे येतात. तर पुणे शहरातील जवळपास साठ हजार रुग्ण येथे अॅडमिट असतात. येथे 155 खाटांचा आय सी यु आहे. मात्र क्षमते पेक्षा जास्त रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयांवर अधिकाचा भार पडत आहे.
पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणार
कॅन्सरचे वाढते रुग्ण पाहता पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल करण्यासाठी राज्य शासन विचाराधीन आहे. त्यासाठी एम एस आर डी सी कडे जागेची मागणी देखील करण्यात आली आहे. ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली.
12 कोटी 94 लाख रुपयांची औषध खरेदी
ससून शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा होत असल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर नुकतेच 12 कोटी 94 लाख रुपयांची औषध खरेदी येथे करण्यात आली आहे. तसेच उपकरणांची देखील खरेदी करण्यात आली. तर जिल्हा नियोजन समितीकडे आणखी औषध खरेदीची मागणी केली आहे.