पुणे, दि.६: जिल्ह्यातील महाविद्यालयात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी व्यवसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकरीता https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १५ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
या नव्याने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ सन २०२४-२५ पासून शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता एकत्रित तयार केलेले आहे. शासकीय वसतिगृहात ऑनलाईन अर्ज केलेल्या, परंतु गुणवतेअभावी शासकीय वसतिगृहात निवड झालेली नाही अशा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज या नवीन प्रणालीव्दारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता ग्राह्य धरले जाणार आहेत.
स्वाधार योजनेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ऑनलाईनपद्धतीने अर्ज केला आहे त्यांनी त्यांच्या लॉगिनमधून बँकेचा तपशील भरावा. अशा विद्यार्थ्यांसाठी बँक तपशील भरण्याबाबत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती श्री. लोंढे यांनी दिली आहे.