मुंबई–
मी केलेल्या विधानामुळे गैरसमज झाला आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी, मुंबईही महाराष्ट्राचाच भाग आहे. मुंबईची भाषा मराठीच, याबद्दल दुमत नाही. मुंबईत बहूभाषिक लोक, सर्वांनी मराठी शिकले पाहिजे, असे म्हणत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी त्यांच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे. तसेच भाषेसाठी कधीही संघर्ष झालेला नाही, असेही भैय्याजी जोशी म्हणाले आहेत.
वादग्रस्त विधान केल्यानंतर भैय्याजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असे मला वाटत आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत असल्याचे काहीही कारण नाही. भारताची एक विशेषत: आहे की येथे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्यात भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही. म्हणूनच भारत देश हे जगासमोर आदर्श उदाहरण आहे. मुंबईतही बहुभाषिक लोक आहेत आणि ते परस्परांवर स्नेहसंबंध ठेवूनच मुंबईचे जीवन चालत आहे. स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा असते की बाहेरून येणाऱ्यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकावी, त्याचे अध्ययन करावे. मराठी भाषा ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासावी असेच आम्हाला वाटते. माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, तो माझा विषय नाही.
मुंबई येथील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात बोलताना संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी म्हणाले, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य महाराष्ट्राचे मंत्री व भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या समोरच केले होते.भैय्याजी जोशी यांच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सनेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठी भाषेवर बोलताना भैय्याजी जोशी यांनी आपण मराठी आहोत याचे मान सोडावे? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. जोशीबुवांनी अशा काड्या करू नये, अशा शब्दात त्यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. इतकेच नाही तर या वक्तव्याचा भाजप निषेध करणार आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपला देखील आव्हान दिले आहे. तर भैय्याजी जोशी हा माणूस चिल्लर आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे किंवा भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.