मुंबई/पुणे- : गेल्या दीड वर्षात पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता (डीन) सातत्याने बदलत राहिल्याने स्थावर व्यवस्थेचे संचलन नीट होत नाही. व्यवस्थापनात त्रुटी राहिल्या आहेत, याकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) विधानसभेत बोलताना सभागृहाचे लक्ष वेधले.
ससून रुग्णालयात एमआरआय तपासणी मशीन बंद पडणे, तपासणी करण्यासाठी दोन -दोन दिवस ताटकळत थांबावे लागते, हे नित्याचे झाले आहे. खाजगी संस्थांमधून एमआरआय ची टेस्ट करून घेणे महागात पडते, याकरिता ससून रुग्णालयात एमआरआय मशीन सहजपणे उपलब्ध होणे गरजेचे असून त्यादृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी, अशीही मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.
सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून ससून रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया मोफत होतात. पण, ससूनमध्ये हृदयरोगतज्ज्ञ कंत्राटी पद्धतीने नेमलेले आहेत. ससूनमध्ये कायमस्वरूपी हृदयरोगतज्ज्ञ नियुक्त करणे आवश्यक आहे, याकडेही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी लक्ष वेधले.
रुग्णांच्या सोयीकरता रुग्णालयासाठी व्हीलचेअर आरोग्य खाते तातडीने खरेदी करणार आहे का, असाही प्रश्न आमदार शिरोळे यांनी विचारला. ससून रुग्णालयाच्या प्रशासनात स्थैर्याची आवश्यकता आहे. तरच तेथील संचालन व्यवस्थितपणे होईल याचाही पुनरुच्चार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला.