मुंबई, दि. ६ मार्च २५
महाराष्ट्र ही साधू, संत व महापुरुषांची भूमी असून पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने देशाला कायमच दिशा देण्याचे काम केले आहे. परंतु मागील काही दिवसात राज्यातील सामाजिक वातावरण बिघडलेले आहे, काही शक्ती राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची संस्कृती व परंपरेला बदनाम करण्याचे काम करत आहेत. राज्यात सामाजिक सौहार्द वाढवणे ही काळाची गरज असल्याने काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रेचे आयोजन केले आहे. शनिवार दि. ८ मार्च रोजी बीडच्या मस्साजोग येथून यात्रेची सुरुवात होणार असून त्यापूर्वी शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मढी येथे कानिफनाथांच्या समाधीचे, भगवानगड येथे संत श्री. भगवानबाबांच्या समाधीचे आणि नारायणगड येथे भगवान नगद नारायणाचे दर्शन घेऊन सामाजिक एकोप्यासाठी साकडे घालणार आहेत.
शनिवारी ८ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग येथे स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेवून ५१ किलोमीटरच्या सद्भभावना पद यात्रेला सुरुवात करतील. दोन दिवस प्रवास करून ही पदयात्रा रविवारी ९ मार्च रोजी सायंकाळी बीड येथे पोहोचेल. तिथे सद्भावना मेळाव्याने पदयात्रेची सांगता होणार आहे. या सद्भावना यात्रेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, हिमाचल प्रदेशच्या प्रभारी खासदार रजनीताई पाटील, जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना व संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
त्यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या शुक्रवारी सकाळी अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श ग्राम हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ते पाथर्डी तालुक्यातील मढी येथे जाऊन संत कानिफनाथांच्या समाधीचे, भगवानगड येथे संत भगवान बाबांच्या समाधीचे आणि नारायणगड येथे भगवान नगदनारायणाचे दर्शन घेऊन सामाजिक एकोपा आणि शांततेसाठी साकडे घालणार आहेत.