मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईची कोणतीही एक भाषा नसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांचा चिल्लर माणूस म्हणून उल्लेख केला आहे. या प्रकरणी त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी भैय्याजी जोशी हा माणूस चिल्लर म्हणून जाहीर करावा किंवा तो बंदा रुपया असेल तर त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणालेत.उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना भैय्याजी जोशी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, काल महायुतीच्या आमदारांसाठी छावा चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात आला होता. मी त्याचे कौतुक केले होते. पण गद्दारांनी त्याला दांडी मारली. पण ही सर्व लोक छावा चित्रपट पाहत असताना काही अनाजी पंत इकडे मुंबईत येऊन मराठी अमराठी अशा वादाचा विष पेरून गेलेत. दुर्दैवाने आता छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. पण महाराष्ट्रात फूटी पाडणारे औरंगजेब व औरंगजेबाला मदत करणारे अनाजी पंत याही जमान्यात जन्माला आलेत. यासारखे दुर्दैव असू शकत नाही.
सध्या काही लोक ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला अशा अविर्भावात फिरत आहेत. ते जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात. त्यातलेच एक असणाऱ्या भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येऊन इथे राहणाऱ्यांना मराठी येण्याची काहीच गरज नाही असे द्वेषाचे गोमूत्र शिंपडून गेले. याचा अर्थ असा की, हा संघाचा व भाजपचा छुपा अजेंडा आहे. यांचे दाखवायचे व खायचे दात वेगळे आहेत. गत काही दिवसांपासून या लोकांनी हिंदुस्तान – पाकिस्तान काढला नाही. आता त्यांनी बटेंगे तो कटेंगे हा विषय काढला आहे. बटेंगे तो कटेंगे म्हणजे केवळ हिंदू – मुस्लीम नाही तर मराठी व अमराठी, पुन्हा मराठीत मराठे व मराठेत्तर अशी सगळी वाटणी करायची आणि राज्य बळकावयाचे हा त्यांचा डाव आहे.उद्धव पुढे म्हणाले, आपल्या देशात भाषावर प्रांतरचना करण्यात आली आहे. आता हे मुंबईत गल्लीवार प्रांतरचना करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा तोडा, फोडा व राज्य कराचा प्रकार आहे. ही अत्यंत घाणेरडी व विकृत मानसिकता सर्वांपुढे आली आहे. काल ज्या प्रमाणे विधानपरिषदेत मुख्यमंत्री बोलले की, कोरटकर-कोरटकर काय बोलता? कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. आता त्यांनी भैय्याजी जोशी हे सुद्धा चिल्लर माणूस आहे हे म्हणून दाखवावे. त्यांनी भैय्याजी जोशी हा चिल्लर माणूस आहे म्हणून जाहीर करावे किंवा हा चिल्लर किंवा बंदा रुपया काय आहे ते त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा.
अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपकार केले नाही-मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे तुम्ही काही उपकार केले नाहीत. कारण, मराठी भाषेचे महत्त्व संघ किंवा भाजपला कळले नसले तरी इंग्रजांना कळले होते. कारण, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा जो अग्रलेख लोकमान्यांनी लिहिला होता तो मराठीत होता. तसेच आम्हीच आमच्या राज्य सरकारला विचारतो की, तुमचे डोके ठिकाणावर आहे का? कारण, मराठी माणसांनी आपले बलिदान देऊन मुंबई मिळवली आहे. मला संघ व भाजपला सांगायचे आहे की, जेव्हा केव्हा मुंबईवर संकट येते तेव्हा आम्ही सर्वजण महाराष्ट्राचे नागरीक म्हणून एकमेकांना वाचवण्यासाठी पुढे येतो. मग तो अतिरेकी हल्ला असो, नैसर्गिक संकट असो की अन्य एखादे संकट असो आम्ही एकजूट होतो.
मुंबई चांगले काम करून जिंका, विष कालवून नाही-हे लोक वात लावून पळतात. कोरोनाच्या काळातही आम्ही सर्वांना आपलेपणाने जपले होते. त्यामु्ळे तुम्हाला साखर टाकता येत नसेल तर मिठाचा किंवा विषाचा खडा टाकू नका. मुंबई एक चांगली महानगरी आहे ती जिंकायची असेल तर चांगले काम करून जिंका, विष कालवून जिंकू नका. तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर चांगल्या कामाची स्पर्धा करा. मुंबईत शिवसेनेने जागतिक रक्तदानाचा विक्रम केला होता. संघाने असे एखादे काम करून दाखवावे. आम्ही त्यांच्या विधानाचा निषेध करतो. अशी विषवल्ली या सरकारने वेळीच ठेचली पाहिजे. भाजप आता उत्तर विरुद्ध दक्षिण असा देश तोडत आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी भैय्याजी जोशींचा समाचार घेताना म्हणाले.