खाते कळले की नाही,आदित्य ठाकरेंचा सवाल; तुमच्या बापानेच खाते दिले होते,पाटलांचे उत्तर:म्हणूनच तुम्ही पळून गेला होता, आदित्यांचे प्र्त्युत्तर
मुंबई- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पाटलांना तुम्हाला खाते कळाले की नाही, असा सवाल केला. त्यावर पाटलांनी मला हे खाते तुमच्या बापानेच दिले होते असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी म्हणूनच तुम्ही पळून गेला होता, असा खोचक टोला त्यांना हाणला. या प्रसंगाने सभागृहात एकच गदारोळ माजला.
आदित्य ठाकरे आज विधानसभेत चांगलेच आक्रमक दिसून आले. त्यांनी आज राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना धारेवर धरले. राज्याच्या मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करून यावा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तर तो राखून ठेवावा. मंत्र्याला सांगा अभ्यास करून उत्तर द्या. पण यामुळे मंत्र्यांना त्यांचे खाते कळाले की नाही हा प्रश्न उपस्थित होते, असे ते गुलाबराव पाटलांना उद्देशून म्हणाले.
आदित्य ठाकरे यांची ही खोचक टिप्पणी गुलाबरावांना चांगलीच जिव्हारी लागली. आदित्य ठाकरे खाली बसल्यानंतर ते लगेच जागेवर उभे राहून म्हणाले, अहो यांच्या बापाला कळले होते, म्हणून त्यांनी मला खाते दिले होते. यावेळी त्यांनी वडिलांऐवजी बाप असा शब्द वापरला. ही चूक लक्षात येताच त्यांनी वडील शब्द वापरून सारवासारव केली. पण या प्रसंगाची म्हणजे गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंचा बाप काढल्याची खमंग चर्चा विधिमंडळ परिसरात चर्चा रंगली होती.
उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना एकजूट असताना गुलाबराव पाटील यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य असायचा. पण आता शिवसेनेतील बंडखोरीनंतर गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचा थेट बाप काढण्याइतपत स्थिती बदलली आहे.
आज विधानसभेत गुलाबराव पाटील हे आपल्या विभागाच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. पाणी पुरवठा, युरिया, नॅनो युरिया, शेणखत आदी विविध प्रश्नांवर बोलत असताना आदित्य ठाकरे मध्येच बोलण्यास उभे टाकले. ते पाहून गुलाबराव पाटलांनी त्यांना शांत बसण्यास सांगितले. त्यावर ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेतला. यावेळी वाद वाढल्यानंतर अध्यक्षांनी या दोन्ही नेत्यांना शांत राहून आपापल्या जागेवर बसण्याचे निर्देश दिले.