आरोग्य मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
मुंबई : उपचारासाठी जीबीएस रुग्णांवर होणारा खर्च जास्त असतो, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी आ.सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) विधानसभेत केली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिरोळे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. जीबीएस रुग्णांना होणारा त्रास तसेच रुग्णाच्या नातेवाईकांचा होणारा खर्च याचा विचार करून आयुष्मान योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना याद्वारे २लाखापर्यंत दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन आबिटकर यांनी सभागृहाला दिले.
जीबीएस आजारावरील औषधे कुठे-कुठे उपलब्ध आहेत? तसेच कमी दरात ती कशी देता येतील? याचाही विचार झाला पाहिजे, असेही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सभागृहाला सांगितले.
जीबीएस रुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात आहे. हा गंभीर स्वरूपाचा आजार पसरू नये याकरिता कोणती काळजी घ्यावी? या विषयीची प्रसिद्धी वर्तमानपत्रे, होर्डिंग्ज, सोशल मीडियाद्वारे प्रशासनाने करावी. महापालिकेकडून नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) उघडण्यात आला आहे. या कक्षाच्या फोन नंबर्सची प्रसिद्धी जास्तीत जास्त झाली पाहिजे. ज्यायोगे रुग्णांना नेमकी माहिती मिळेल आणि लवकरात लवकर उपचार करणे शक्य होईल. तरी ही सूचना त्वरीत अमलात आणावी. असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सरकारला केले.