मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आमदारांना छावा चित्रपट दाखवण्याच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला. गद्दारांना छावा चित्रपट दाखवलाच पाहिजे. विशेषतः सूरतेला पळून गेलेल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत कशी लुटली होती हे दाखवण्यासाठी त्यांचाही चित्रपट दाखवला पाहिजे, असे ते म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या पक्षासह महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आमदारांना छावा चित्रपट दाखवण्याच्या मुद्यावरून सरकारचे कौतुक करत एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधला. आमदारांना छावा चित्रपट दाखवण्याच्या संकल्पनेचे मी स्वागत करोत. संभाजी महाराजांवरील छावा चित्रपट दाखवत आहेत. ही चांगली गोष्ट आहे.पण शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटही दाखवला गेला पाहिजे. आपल्या महाराजांनी सूरत कशी लुटली होती हे सूरतेला पळून गेलेल्यांना दाखवले पाहिजे. त्यांना त्यांचे शौर्य दाखवले पाहिजे. मेलो तरी बेहत्तर, पण त्यांनी धर्म बदलला नाही. त्यामुळे आपल्या संभाजीराजांचा चित्रपट गद्दारांना दाखवलाच पाहिजे, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोगल बादशहा औरंगजेब याचे कौतुक केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेल्या सप आमदार अबू आझमी यांच्यावरही भाष्य केले. अबू आझमी यांचे निलंबन किती दिवसांसाठी करण्यात आले हे महत्त्वाचे आहे. कारण, हे निलंबन अधिवेशनापुरते नव्हे तर संपूर्ण 5 वर्षांसाठी करण्याची गरज होती, असे ते म्हणाले.उद्धव ठाकरे यांनी यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निलंबनाचीही मागणी केली. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यास आमच्याकडून उशीर झाला. आत्तापर्यंत त्या निलंबित होण्याची गरज होती. याच अधिवेशनात त्यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. आम्ही ज्या कारणांसाठी अविश्वास प्रस्ताव दाखल केला, ती कारणे तुमच्यासमोर येतील. याशिवाय पक्षांतर हा देखील विषय आहे, असे ते म्हणाले.दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या मर्सिडीजच्या विधानावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी माझ्या शिवसेनेच्या महिला रणरागिणी व शिवसैनिकांनी त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिल्याचे स्पष्ट केले.