पुणे – अनेक तरुणींना लेह लडाखला दुचाकीवर प्रवास करण्याची अथवा ऍडव्हेंचर बाईकवर राईड मारण्याची इच्छा ‘बकेटलिस्ट’ असते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांच्या या बकेटलिस्ट अपूर्णच राहतात. तरुणींची नेमकी हीच इच्छा पुण्यातील उद्योजिका शुभांगी सावंत यांनी पूर्ण केली. महिलांना क्षणभर विरंगुळा मिळावा व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने महिला दिनानिमित्त शुभांगी इंडस्ट्रीच्या वतीने ऍडव्हेंचर बाईक राईडसह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. लोहगावमधील खांडवे नगर येथील मैदानावर हा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी स्त्री-शक्तीचा सन्मान करुन विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये २०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला व बाइकर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये इंडोनेशिया सह मुंबई, जयपूर मधून देशातील इतर शहरांतून ४० हुन अधिक बाईकर्स सहभागी झाले होते. विविध राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पोर्ट्स बाईक्सचे दर्शन यावेळी बाईकप्रेमींना बघायला मिळाले.
यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक सतीश मुंद्रा, डॉ. राजेंद्र शिंपी, शुभांगी इंडस्ट्रीच्या शुभांगी सावंत, मोटोपार्क१९९चे रुपेश चोंधे उपस्थित होते.
बाल मानसोपचारतज्ज्ञ असणाऱ्या शुभांगी सावंत यांनी साधारणतः पंधरा वर्षांपूर्वी लोहगाव भागात जागा खरेदी केलेली. अधून मधून त्याठिकाणी भेट देत असत, त्यानिमित्ताने त्यांची भेट तेथील महिलांशी होत असे, भेटीवेळी तेथील महिला सातत्याने त्यांना ‘या ठिकाणी फॅक्टरी टाकताय का?’ हा एकच प्रश्न विचारत. शिक्षणाचा अभाव व नाजूक आर्थिक परिस्थिती असलेल्या महिलांची अवस्था पाहून त्या अस्वस्थ झाल्या. या महिलांना त्यांच्या भागात रोजगार मिळावा या उद्देशाने शुभांगी सावंत यांनी “शुभांगी इंडस्ट्रीची” निर्मिती केली. शुभांगी इंडस्ट्रीच्या माध्यमातून विविध घरगुती मसाले तसेच स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या लिक्विड निर्मितीवर भर दिला. त्यासाठी स्थानिक महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक सक्षम केले. केवळ यावर न थांबता त्यांना अर्थ साक्षर करत बचत गटाची निर्मिती केली. यातून त्यांच्या परिवारासाठी विविध कार्यक्रम घेत मानसिक, सामाजिक जनजागृती करण्यास सुरुवात केली. महिला दिनाचे निमित्त साधत शुभांगी यांनी महिलांची “बकेटलिस्ट” पूर्ण केली.
शुभांगी सावंत म्हणाल्या की, प्रत्येक तरुणींना आपले छंद जोपासण्यासाठी दैनंदिन जीवनातून वेळ काढणे त्यांना शक्य होत नाही. साहसी खेळांचा अनुभव हा नेहमीच जगायला नवीन ऊर्जा प्रदान करणारा असतो त्यामुळे महिलांसाठी हा कार्यक्रम घेण्याचे ठरविले. यावेळी दैनंदिन जीवनातून वेळ काढत अनेक गृहिणींनी कौतुकाने बाईक रायडर तरुणींशी संवाद साधला. विना गियर दुचाकी चालविणाऱ्या तरुणींनी ऍडव्हेंचर बाईक चालविण्याचे तंत्र शिकून घेतले. यावेळी अनेक तरुणींनी आपल्याला लेह लडाखला दुचाकीवर प्रवास करण्याची इच्छा ‘बकेटलिस्ट’ व्यक्त केली. मात्र रक्त गोठवणाऱ्या थंडीतून, दर्या खोर्यातून, नदीच्या प्रवाहातून, वाळवंटातून, अपुऱ्या ऑक्सिजन असलेल्या वातावरणातून अनेक संकटांवर मात करत प्रवास यशस्वी कसा करायचा याविषयीच्या अनेक गोष्टी यानिमित्ताने तरुणींना कळाल्या.