‘लाइनमन दिन’ उत्साहात साजरा
पुणे, दि. ०५ मार्च २०२५: अत्यंत धकाधकीच्या वीजक्षेत्रात २४ तास वीजपुरवठ्यासह तत्पर ग्राहकसेवा देण्यासाठी सज्ज असलेल्या पुणे परिमंडलातील जनमित्रांसाठी मंगळवारी (दि. ४) आयोजित ‘लाइनमन दिन’ ऊर्जा देणारा ठरला. पुणेकर वीजग्राहक व कौटुंबिक सदस्यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून लाइनमन व लाइनवूमन यांना शाबासकीची थाप देत, वीजसुरक्षेचा आग्रह करीत शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या या आत्मियतेने जनमित्रांसह उपस्थित देखील भारावले.
‘लाइनमन दिना’निमित्त पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी गणेशखिंड येथील विश्रामगृहाच्या प्रांगणात मंगळवारी (दि. ४) सायंकाळी आयोजित कार्यक्रम मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून आगळावेगळा ठरला. या कार्यक्रमात ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते श्री. नाना पाटेकर, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुनील रासने यांच्यासह घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वीजग्राहक तसेच कर्मचारी कुटुंबातील पती, पत्नी, आईवडील, सासूसासरे व मुलेमुली अशा ७८ जणांनी शाबासकीची थाप देत सर्व लाइनमन व लाइनवूमन यांचा गुणगौरव केला. काहींनी कोविड काळातील सेवा कार्याचे खडतर प्रसंगही सांगितले. यासह वादळवारा, पावसाळा, रात्रीबेरात्री वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शहरी व ग्रामीण दऱ्याडोंगरात कर्तव्य बजावणाऱ्या जनमित्रांच्या वीजसुरक्षेची काळजी व्यक्त केली. ‘वीजयंत्रणेत काम करताना आमची आठवण ठेऊन सुरक्षा साधनांचा प्रत्येकवेळी वापर करा’ असे गलबलून सांगणाऱ्या मुलामुलींचे आवाहन सर्वांच्या मनात घर करून गेले.
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, मानवी मूलभूत गरजेसह सर्वांगिण विकासासाठी वीज आवश्यक आहे. विजेशिवाय सर्वच काही ठप्प अशी स्थिती आहे. अशा क्षेत्रात वीजग्राहकांना तत्पर सेवा देणारे लाइनमन व लाइनवूमन खऱ्या अर्थाने महावितरणचा कणा आहेत. मात्र, वीजयंत्रणेत काम करताना कायम सजग राहा. कोणताही धोका पत्करू नका. सुरक्षा साधनांचा प्रत्येकवेळी वापर करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांनी वीजसुरक्षेची शपथ घेतली. तसेच महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले व त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रातिनिधिक गौरव करण्यात आला.
‘लाइनमन दिना’निमित्त आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच वीजसुरक्षा, प्रधानमंत्री सूर्यघर योजना आदींबाबत उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी प्रबोधन केले. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले, सहायक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त) व सौ. शितल निकम (प्रभारी, मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी यांनी केले. कार्यक्रमाला तांत्रिक कर्मचाऱ्यांसह अभियंते व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैद्यकीय उपक्रमांसाठी पुरंदर ब्लड बॅंक, केके आय इन्स्टिट्यूट यांनी सहकार्य केले.