पुणे : दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजिलेल्या ‘पेस २०२५’, आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या उत्साह व प्रतिभेचे दर्शन पाहायला मिळाले. ३० पेक्षा अधिक महाविद्यालयातून १८२ संघांतून जवळपास २४०० खेळाडूंनी महोत्सवात सहभागी घेतला. २८ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२५ या कालावधीत दिघी येथे एआयटी कॅम्पसमध्ये झाल्या. ‘पेस २०२५’ क्रीडा महोत्सवात बास्केटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कबड्डी, स्क्वॅश आदी स्पर्धा झाल्या.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या बॉक्सर जैस्मिन लांबोरिया यांच्या हस्ते ‘पेस’ महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रसंगी आरजे संग्राम खोपडे यांची विशेष उपस्थिती होती. भारतीय महिला बास्केटबॉल संघाच्या प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अर्निका गुजर पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. प्रसंगी ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर (नि.) अभय भट, सहसंचालक कर्नल (नि.) एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील यांच्यासह स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
क्रिकेट (मुले) – भारती विद्यापीठ, कबड्डी – एआयएसएसएमएस सीओई पुणे, बॅडमिंटन (मुले व संमिश्र) – एआयटी पुणे, बॅडमिंटन (मुली) – अमृता गाडेकर (एमआयटी), व्हॉलीबॉल (मुले) – एआयटी पुणे, व्हॉलीबॉल (मुली) – एएफएमसी पुणे, बास्केटबॉल (मुले) – एआयटी पुणे, बास्केटबॉल (मुली) – इंदिरा कॉलेज पुणे, फ़ुटबॉल ११अ (मुले) – एआयटी पुणे, फुटबॉल ६अ (मुले) – व्हीआयआयटी पुणे, फुटबॉल (मुली) सिंहगड कॉलेज, स्क्वॅश (मुले-एकेरी) – बॉबी, लॉन टेनिस (मुले) – आशुतोष (सीओईपी), लॉन टेनिस (मुली) – एमआयटी पुणे, टेबल टेनिस (मुली) – आयआयसीएमआर, टेबल टेनिस (मुले) – जेएसपीएम पुणे, बुद्धिबळ (मुली) – एआयटी पुणे, बुद्धिबळ (मुले) – व्हीआयटी पुणे यांनी विजय मिळवला.
अर्निका गुजर पाटील म्हणाल्या, “महाविद्यालयीन स्तरावरील क्रीडा स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ असते. त्यामुळे सहभाग घेत अधिकाधिक चांगला खेळ करणे महत्वाचे आहे. आवडीच्या खेळातील कौशल्ये आत्मसात करीत स्वतःला सक्षम बनवावे, तंदुरुस्तीवर व सरावावर भर द्यावा. त्यातूनच खेळाडू घडतात. महाविद्यालयाचे, राज्याचे, देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आकांक्षा उराशी बाळगावी.”
जैस्मिन लांबोरिया यांनी क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये नवोन्मेषी अभियांत्रिकी उपाययोजना समाविष्ट करण्याच्या महत्त्वावर भर दिला. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुयोग्य रचना केवळ खेळाडूंच्या कामगिरी आणि सुरक्षिततेस मदत करत नाहीत, तर प्रेक्षकांच्या अनुभवातही मोठी भर घालतात, ज्यामुळे क्रीडा स्पर्धा सर्वांसाठी अधिक सुलभ आणि रोमांचक बनतात, असे त्यांनी नमूद केले.
आरजे संग्राम खोपडे यांनी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य यामध्ये खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. तरुण पिढी आपल्या देशाचे भविष्य घडवणारी असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिगेडियर अभय भट यांनी विद्यार्थ्यांतील खेळभावना वृद्धिंगत होण्यासाठी ‘पेस’सारखे उपक्रम वाढायला हवेत. खेळांमुळे तरुण पिढी अधिक उत्साही, सक्षम होईल, असे त्यांनी नमूद केले.