मुंबई: विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी काल (ता. ३) विधानसभेच्या आठ तालिका अध्यक्षांची घोषणा केली. यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालिका अध्यक्ष नियुक्तीवर आमदार पठारे म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी तसेच विविध विषयांवर, विधेयकांवर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी ‘तालिका अध्यक्ष’ म्हणून असलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने आणि पारदर्शकतेने पार पाडेल. लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे ही माझी प्राथमिकता असेल.” तसेच, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे त्यांनी आभार मानले.
पठारे हे वडगावशेरी मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. २००९-२०१४ या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती आणि नागरी विकासाच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना दिली आहे. सध्याही ते मतदारसंघात करत असलेल्या विकासकामांबद्दल नागरिकांमध्ये सकरात्मक चर्चा होताना दिसते आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेचा अनुभव वडगावशेरीकरांनी यापूर्वीही घेतला आहे व आताही घेत आहेत. विधानसभा सदस्य म्हणून विविध धोरणात्मक निर्णय व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पठारे यांच्या या एकूणच अनुभवाच्या पार्श्वभूमीवर तालिका अध्यक्ष या पदाला ते योग्य न्याय देतील, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
बापूसाहेब पठारे यांच्यासह योगेश सागर, संजय केळकर, बबनराव लोणीकर, रमेश बोरणारे, दिलीप बनकर, सुनील राऊत व अमित झनक यांचीही तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.