पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ऋत्विक सेंटरतर्फे विविध क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आणि त्यांच्या कलेतील ‘ती’ या अनोख्या संकल्पनेवर परिसंवाद, कविता रसग्रहण, तबला वादन, नाट्य आणि चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ऋत्विक सेंटर आयोजित दोन दिवसीय विशेष कार्यक्रम शनिवार, दि. 8 आणि रविवार, दि. 9 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळात ऋत्विक सेंटर, वेद भवनजवळ, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. चित्रकाराला दिसलेली ‘ती’ या संकल्पनेवर आधारित प्रख्यात चित्रकार प्रसाद भारद्वाज यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन दोनही दिवस सकाळी 11 ते सायंकाळी 8 या वेळात खुले असणार आहे.
शनिवार, दि. 8 मार्च रोजी ‘कविला उमगलेली ती’ या संकल्पनेवर आधारित वैभव जोशी यांचे ‘ती’च्या वरील कवितांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन अभिनेत्री समिरा गुजर-जोशी करणार आहेत.
दिग्गज कलाकारांनी विविध कलाप्रकारातून केलेला स्त्रीचा गौरव या अंतर्गत विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्दर्शक सुनील सुकथनकर, चित्रकार राजू सुतार आणि नर्तक डॉ. परिमल फडके यांना पॉडकास्टर सौमित्र पोटे ‘विविध कला प्रकारातून ती’ या विषयी बोलते करणार आहेत.
रविवार, दि. 9 मार्च रोजी ‘चित्रकथीमधील ती’ या अंतर्गत कोंकणी लोककलेवरून प्रेरित ‘मिथ ऑफ मँडिगोज’ हे नाट्य सादर होणार आहे. याचे लेखन, दिग्दर्शन शंतनु सायली यांचे आहे. सुप्रसिद्ध तबला वादक सावनी तळवलकर यांचे एकल तबलावादन होणार असून त्यांना स्वानंद राजोपाध्ये संवादिनी साथ करणार आहेत.
कार्यक्रमाची संकल्पना सुप्रसिद्ध चित्रकार प्रसाद भारद्वाज यांची असून दोन दिवसीय कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती ऋत्विक सेंटरच्या समन्वयक श्रुती पोरवाल यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कलांमधून उलगडणार ‘ती’आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शनिवार, रविवारी आयोजन
Date: