मुंबई-समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दले केलेले विधान मागे घेतले आहे. माझ्या शब्दांचा विपर्यास केल्याचे ते म्हणाले. मी बोलताना कोणत्याही महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्य केले नसल्याचेही आझमी यांनी स्पष्ट केले. या मुद्द्याला राजकीय मुद्दा बनवले जात असल्याचा आरोपी अबू आझमी यांनी यावेळी केला. अबू आझमी यांनी त्यांचे विधान मागे घेतल्यानंतर हा वाद संपणार का? हे पाहावे लागणार आहे.अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. एकनाथ शिंदे यांनी तर अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आज विधानसभेतही अबू आझमींच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे सभागृहाचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. या सर्व घटनांनंतर अबू आझमी यांनी आपल्या औरंगजेब बद्दलच्या विधानावर स्पष्टीकरण दिले.
आझमी म्हणाले की, जेव्हा मी विधानसभेतून बाहेर आलो आणि पत्रकारांशी बोललो, तेव्हा पत्रकारांनी मला आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींची औरंगजेबाशी केलेली तुलना यावर प्रतिक्रिया देण्यास सांगितले, ज्यावर त्यांनी इतिहासकारांनी जे म्हटले आहे तेच पुन्हा सांगितले. जेव्हा इतिहासकारांवर बंदी नाही, तर त्यांच्या विधानावर इतका गोंधळ का होत आहे? असा प्रश्नही अबू आझमी यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे स्पष्ट केले की ते कधीही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा डॉ. आंबेडकर यांचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाहीत. ते म्हणाले की, अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधाने केली, परंतु त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला आहे. औरंगजेब रहमतुल्लाह अलेह बद्दल, जे इतिहासकार आणि लेखकांनी म्हटले, तेच मी म्हटले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतेही अपमानजनक भाष्य केलेले नाही. परंतु तरीही माझ्या विधानामुळे कोणी दुखावले असेल तर मी माझे शब्द, माझे विधान मागे घेतो, असे अबू आझमी म्हणाले.या मुद्द्याला राजकीय मुद्दा बनवले जात आहे आणि यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद करणे म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचे नुकसान करणे आहे, असे मला वाटते, असेही अबू आझमी म्हणाले.
औरंगजेबाबत बोलताना काय म्हणाले होते आझमी?
मोगल बादशहा औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्यात व छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती. उलट त्याच्याच काळात भारताला सोन्याची खाण म्हणून संबोधले जात होते, असा वादग्रस्त दावा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केला आहे. औरंगजेबाची कबर खोदण्याबद्दल बोलणारे भाजप नेते जातीय सलोखा बिघडवत आहेत. सद्यःस्थितीत महाराष्ट्रासह देशात मुस्लिमांवर अत्याचार वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी ‘सोने की चिड़िया’, असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही.