मुंबई-अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात देशाचा जीडीपी 24 टक्के होता. भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती, असे म्हणत औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची नाही, तर सत्तेसाठी होती, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले. औरंगजेबाचे गोडवे गायल्याबद्दल सपाचे आमदार अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, असेही शिंदे म्हणाले.
अबू आझमी यांच्या औरंगजेबावरील वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अबू आझमींना निलंबित करावे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आली होती. या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे आजचे दिवसभराचे कामकाम स्थगित केले.काल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजेच औरंग्याचे गोडवे, याठिकाणी अबू आझमीने गायले. खरे म्हणजे अबू आझमीचा निषेध करायला हवा. अबू आझमीचा धिक्कार करतो. अबू आझमीचा धक्कार करत असताना, अबू आझमीने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय चुकीचे वक्तव्य केले होते. अबू आझमी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जाणीवपूर्वक अपमान करतो, असा आरोपी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना केला.छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केले, आपल्या प्राणाचे बलिदान केले मात्र धर्म बदलला नाही. अशा संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणे, म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे. म्हणून या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आपण ‘छावा’ बघा, रईस… छावा सिनेमा बघा, असे आवाहनही त्यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराजांवर 40 दिवस अनन्वित अत्याचार केले. त्यांचे डोळे काढले, त्यांची नखे काढली, त्यांची जीभ कापली, अंगावरची कातडी सोलून त्यावर मीठ टाकले, एवढा अपमान केला, चाळीस दिवस हा अत्याचार सुरू होता. धर्म बदला म्हणून सांगितले. अशा औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्र पुरुषांचा अपमान आहे. आपल्या देशभक्तीचा अपमान आहे, असा घणाघात करत एकनाथ शिंदे यांनी
देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।
महा पराक्रमी परम प्रतापी, एकही शंबू राजा था।।
हा शेर सभागृहात म्हटला.
शंभू राजाने 9 वर्षांत 69 लढाया जिंकल्या. अरे लाज वाटायला हवी. या औरंगजेबाने आपली मंदिरे तोडून टाकली. आया-बहिणींवर अत्याचार केला. आया-बहिणींवर बलात्कार झाले. या औरंग्याने बापाला कैद केले, मुलांना मारून टाकले. 27 लोकांना मारले. असे सांगत, अबू आझमी निलंबित झाला पाहीजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.