धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ नका:त्यांना बडतर्फ करा, अंजली दमानियांची मागणी; बडतर्फ न केल्यास अधिवेशन बंद पाडण्याचा इशारा
मुंबई–काल ते धनंजय मुंडे म्हणत आहेत माझ्याविरुद्ध जे जे बोलले त्यांना मी धडा शिकवीन, मी त्यांना ओपन चॅलेंज देते मला जो धडा शिकवायचा आहे तो शिकवा तुम्हाला जे करायचे आहे ते करा असेल हिम्मत तर बघू आपण. मी लढाईची ताकद ठेवते असे आव्हान अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे. त्या आज माध्यमांशी बोलत होत्या. धनंजय मुंडेंना बडतर्फ केले नाही तर आम्ही अधिवेशन बंद पाडू असा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरले आहे. सुरुवातीपासून त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे हृदयद्रावक फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अश्रू अनावर झाले होते. धनंजय मुंडेंना बडतर्फ केले पाहिजे, असे लोक सत्तेत कशासाठी हवेत, असा जाबही त्यांनी सरकारला विचारला.अंजली दमानिया म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा केवळ राजीनामाच घेऊ नये, तर त्यांना बडतर्फही केले पाहिजे. मुंडेंच्या माणसाने 10 वर्षं संघटित गुन्हेगारी केली, तरीही सरकार असे असंवेदनशील का वागत आहे? असा सवालही दमानिया यांनी केला. वाल्मीक कराडला का अशी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते आहे. त्या थर्डक्लास कराडला कोठडीतही व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते? असाही सवाल त्यांनी केला. मी धनंजय मुंडेंविरोधात आतापर्यंत कितीतरी पुरावे दिले आहेत. परंतु, पुरावे दिले की, आरोप सिद्ध होऊ देत असे बोलतात. हे नेमके काय चालले आहे?
अजित पवारांनी लोकप्रतिनिधी म्हणून वागावे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्या देवेंद्र फडणवीसांना या फोटोबाबत, व्हिडिओबाबत माहिती नव्हते का? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. जर आज यांचा आता राजीनामा नाही आला, बडतर्फ केले गेले नाही.. तर संपूर्ण महाराष्ट्रात जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले त्या सगळ्यांना मी हात जोडून निवेदन करते की उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोहोचायचे आणि यांचा अधिवेशन बंद पाडायचा, असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील आठवडा भरापासून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा यावर खलबंत सुरू होती, मात्र मुख्यमंत्र्यांकडून दोन वेळा क्लीनचीट देण्यात आल्यामुळे राजीनामा घेण्यास उशीर झाला असल्याची माहिती आहे.