मुंबई-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. या प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे.दरम्यान काल माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले दोन दिवसांनंतर आम्ही ठरवू. धनंजय मुंडे यांच्यावर पक्षातून दबाव आहे, मात्र त्यांची राजीनामा देण्याची इच्छा नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये लोकांचे आणि स्वतःच्या पक्षातील आमदार, खासदारांचे किती प्रेशर येते? ही गोष्ट थांबवता येऊ शकते का? ते पाहून त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.
पुढे करुणा शर्मा म्हणाल्या, मला मंत्रालयातून माहिती मिळाली आहे. माझे काही लोक आहेत, त्यांच्याकडून मला माहिती मिळाली आहे. सर्वांना माहिती आहे, धनंजय मुंडे छोटा मोठा आमदार किंवा मंत्री नाहीत. जो अजितदादा गट आहे, तो अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे. त्यामुळे स्वतःच्या पक्षात स्वतःची चालणार. पक्ष त्यांचा आहे मी एवढ्या वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे, मला सर्व काही माहिती आहे. म्हणूनच मी हे सांगत आहे, असे करुणा शर्मा म्हणाल्या.