गजाने चिथावणी दिल्याचा आरोप ,गजाच्या २ दोन फॉर्च्युनर कारही केल्या जप्त,गाजला आता संपविणार या मार्गावर पोलीस जात असतानाच ..झाली माघार अन देवेंद्र जोगांच्या प्रतिज्ञापत्राने पोलीस पडले तोंडघशी.. दडलेले सत्य काय ?
पुणे- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना कोथरूड भागात झालेल्या मारहाणीप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. जोग यांनीच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत मारहाण क्षणिक रागातून झाली असून कोणाच्या चिथावणीमुळे झाली नसल्याचे न्यायालयाला सांगितले.यामुळे गजा मारणे याच्या विरुध्द पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची होती हे स्पष्ट झाले आहे , हि चूक नजरचूक तर होऊ शकणार नाही पण या कडे राजकीय दबावाला बळी पडलेले किंवा तोंडघशी पडलेले पुणे पोलीस असे कोणी म्हटले तर नवल वाटणार नाही
कोथरुड भागात १९ फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर मंत्री मोहोळ यांनी संताप व्यक्त करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुंड गजा मारणे, साथीदार रुपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड), तसेच श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मारणेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर मारणे सोमवारी सायंकाळी कोथरुड पोलीस ठाण्यात हजर झाला. देवेंद्र जोग यांना मारहाण करताना गुंड गजा मारणे, रुपेश मारणे यांनी साथीदारांना चिथावणी दिल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते . त्यानंतर न्यायालयाने मारणेला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.गुन्हे शाखेने आरोपी मारणे याला सोमवारी (दि. ३) न्यायालयात हजर केले. त्यासोबतच, न्यायालयीन कोठडीतील तिन्ही आरोपींना मोक्का न्यायालयाच्या ‘प्रोडक्शन वॉरंट’ने ताब्यात घेऊन कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलिसांकडून चारही आरोपींच्या दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मारणे आणि इतर तीन आरोपींना समोरासमोर बसवून गुन्ह्याचा तपास मोक्का कायद्यान्वये करायचा आहे. अन्य वाहने जप्त करायची आहेत. आरोपींच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याचा तपास करायचा आहे.
आरोपींची एक संघटित टोळी असून त्यांनी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी यांसारखे गुन्हे करून बेकायदेशीरपणे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळविली आहे, त्याबद्दल तपास करायचा आहे. चारही आरोपी सराईत असून जनमानसात त्यांची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे साक्षीदार व फिर्यादी हे प्रचंड दबावाखाली असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती न्यायालयाला दिली. घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण सायबर तज्ञांच्या मदतीने जप्त करण्यात आले. न्यायालयीन कोठडीतील तिन्ही आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. दोन दुचाकी आणि दोन फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आल्या. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तपास करण्यात आला, असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, फिर्यादी देवेंद्र जोग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. यामध्ये त्यांना झालेली मारहाण ही क्षणिक रागातून झाल्याचे नमूद केले. जोग यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले की, “या प्रकरणात मारहाण करणाऱ्यांना चिथावणी दिल्याचे मला वृत्तपत्रांतील बातम्यांतून समजले. मात्र घटना घडताना कोणीही चिथावणी दिली नाही. मारहाण करणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त घटनास्थळावर कोणी नव्हते. माझ्या समक्ष कोणाच्या सांगण्यावरून मला मारहाण झाली नव्हती. मी केवळ तीन ते चार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती.” दरम्यान, जोग यांनी दिलेल्या या प्रतिज्ञापत्रामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. पोलिसांनी मारणेवर दाखल केलेल्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आणि मोक्का अंतर्गत कारवाईचे पुढे काय होणार हे स्पष्ट झाले आहे. .
प्रथमपासूनच हा खोटा गुन्हा आहे. गुन्हेगारी कमी करण्याच्या प्रयत्नात गजानन मारणेवर पूर्वीचे गुन्हे आहेत. म्हणून त्याला गुंतवण्यात आले. घटनास्थळावर गजानन मारणे हजर नव्हता. मारणेपासून पाचशे मीटरवर घटना घडली. त्यामुळे चिथावणी देण्याचा प्रश्नच येत नाही. फिर्यादीने स्वतः वकिलांमार्फत हजर होऊन या युक्तिवादाला पुष्टी दिली आहे. खोट्या केसमुळे लवकरच जामीनासाठी मागणी करणार आहोत.–अॅड. विजयसिंह ठोंबरे, आरोपींचे वकील