माजी खासदार प्रदीप रावत यांचे मत : स्वानंद चारिटेबल ट्रस्टतर्फे डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहकार्याने ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण
पुण्याचा प्रांजल अक्कलकोटकर स्पर्धेचा महाविजेता
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चारित्र्य आणि विचार हाणून पाडण्याचा प्रयत्न सतत चालू असतो, परंतु त्यांचा विचार आज राष्ट्रीय विचार झाला आहे. त्यांच्या विचारांचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. ‘सकल हिंदू बंधू बंधू’ हा त्यांचा विचार जोपर्यंत रुजणार नाही, तोपर्यंत हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वाला ठोसपणा येणार नाही. हिंदू संघटन करायचे असेल तर राजकीय हिंदुत्व प्रबळ करावे लागेल, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.
स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहकार्याने आयोजित ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. आगरकर रस्त्यावरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्वा. सावरकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, सात्यकी सावरकर, संयोजन समितीचे धनंजय बर्वे, रणजीत नातु, अमेय कुंटे, प्रवीण गोखले, रवी ढवळीकर उपस्थित होते.
पुण्याचा प्रांजल अक्कलकोटकर हा स्पर्धेचा महाविजेता ठरला तर मिलिंद जोशी, ऋजुता जोशी, ज्ञानेश्वरी ढोबळे, सुलक्ष्मी बाळगी, शशांक भोसले, आशुतोष कुलकर्णी, मंजिरी काळे, प्रांजल अक्कलकोटकर, गौरी प्रभू, कमलेश मराठे, ॲड.राम धुमाळ, शशांक अमराळे यांनी स्पर्धेच्या विविध भागातील विजेतेपद पटकावले.
प्रदीप रावत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे हे वैचारिकदृष्ट्या एक नाहीत. महात्मा गांधी यांच्या हत्येने सावरकरांची पुण्याई संपवली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांसारख्या संघटनांना राजकीयदृष्ट्या अस्पृश्य ठरविण्यात आले. हिंदू समाज हा वैश्विक समाज बनला आहे. परंतु नैतिकदृष्ट्या देखील तो उन्नत व्हायला हवा. हिंदू समाजात सावरकरांचे विचार आजही पूर्णपणे रुजू झाले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
रणजीत सावरकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बुद्धिनिष्ठ आणि व्यावहारिकता हे विचार आपल्यात उतरले पाहिजेत. प्रत्येक हिंदू ने आज हे पक्के करायची वेळ आली आहे, की माझ्या खिशातील प्रत्येक पैसा हा माझ्याच माणसाच्या खिशात कसा जाईल आणि त्यातून हिंदूंचा आर्थिक उत्कर्ष कसा होईल. ह्यावर उपाय म्हणजे ॐ प्रमाणपत्र प्राप्त व्यावसायिकांकडूनच आपल्या हवा असलेला माल किंवा सेवा घ्यायला सुरुवात केली पाहिजे.
सात्यकी सावरकर म्हणाले, जे सावरकरांना भित्रा म्हणत होते, तेच सावरकर या नावाला आज घाबरत आहेत. संविधानाची प्रत हातात घेऊन सावरकरांची अपकीर्ती करणारे आज न्यायालयात येण्यास देखील घाबरत आहेत. मात्र त्यांच्या विरोधात शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.