“वंदे स्त्रीत्वम्” कवितासंग्रहाचे प्रकाशन
पुणे – भारतातील २५ प्रेरणादायी महिलांवर एआय (AI) चा वापर करून यशवंत क्लासेसच्या विद्यार्थिनींनी लिहिलेल्या “वंदे स्त्रीत्वम्” या कवितासंग्रहाचे प्रकाशन राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, दत्तात्रय धनकवडे आणि यशवंत क्लासेसचे संस्थापक शितल पाटील तसेच उज्वला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत असलेल्या आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि तितक्याच समरसतेने पालक आणि गृहिणी पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या आदर्श महिलांचा सन्मान राज्यसभेच्या खासदार सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. पुण्यातील यशवंत क्लासेसने “वंदे स्त्रीत्वम्” या उपक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला खा. सुनेत्राताई पवार प्रमुख पाहुण्या म्हणून आणि यशवंत क्लासेसचे ब्रँड अंबेसेडर अभिनेता आणि संवेदनशील कवी संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. संकर्षण यांनी आपल्या खुमासदार शैलीत विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या आग्रहामुळे त्यांनी आपली “आई” ही कविता सर्वांना ऐकवून संपूर्ण सभागृहाला अंतर्मुख केले.
कार्यक्रमास येणाऱ्या सर्व विद्यार्थिनी, युवती, महिलांच्या वर पुष्पवृष्टी करत, तुतारीच्या निनादात स्वागत करण्यात आले. हर्षवर्धन पाटील यांनी आभार मानले. यशवंत क्लासेस चे विद्यार्थिनी, माता भगिनी, पालक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शीतल पाटील यांनी पुण्यात फक्त मुलींसाठी आणि महिलांसाठी महिलांनी सुरू केलेले कौशल्य प्रशिक्षण केंद्र आणि स्टार्ट अप सुरू करण्याचे मार्गदर्शन करणारे तसेच इन्क्यूबेशन सेंटर असावे अशी मागणी केली त्याला तत्काळ खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
खा. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, कोणत्याही परिस्थितीत न डगमगता संयमाने महिलांनी शिक्षण आणि कौशल प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी झालेच पाहिजे असा कानमंत्र दिला. बारामती येथील सायन्स पार्क तसेच इन्क्यूबेशन सेंटर मध्ये क्लासेसच्या विद्यार्थ्यांना येण्याचे निमंत्रणही दिले. काटेवाडी गावाच्या स्वच्छता उपक्रमाची माहिती सांगून त्यांच्या पर्यावरण जागरूकता आणि संरक्षणाच्या उपक्रमात विद्यार्थिनी आणि महिलांनी पण सहभाग द्यावा असे प्रतिपादन केले. महिलांनी महिलांकरिता कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या उपक्रमाला सर्व ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यंदाचा आंतरराष्ट्रीय महिला दिन यशवंत क्लासेसने “वंदे स्त्रीत्वम्” या उपक्रमाद्वारे हा महिला पालक तसेच गृहिणींना समर्पित करत असल्याची घोषणा या प्रसंगी खा. सुनेत्रा पवार यांनी केली.
खा. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते कर्तृत्वान महिलांचा सन्मान
Date: