मुंबई- विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार येत्या 27 मार्च रोजी निवडणूक होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय रस्सीखेच रंगणार आहे.गत विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी, प्रवीण दाटके, राजेश विटेकर, रमेश कराड, गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेचे 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणूक जाहीर केली. त्यानुसार, इच्छुक उमेदवारांना 10 मार्च पासून आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 17 मार्च ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 18 मार्च रोजी दाखल अर्जांची छाननी केली जाईल.
20 मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 27 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत निवडणूक होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वा. लगेचच मतमोजणीला सुरुवात होऊन रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होतील. उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात चांगलीच चुरस दिसून आली होती. त्यामुळे या निवडणुकीतही अशीच चुरस पहावयास मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कोणत्या पक्षाकडून कोणत्या नेत्याला यासाठी संधी मिळते हे पाहणेही या प्रकरणी महत्त्वाचे ठरणार आहे.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे भाजप विधान परिषदेच्या एका जागेवर मनसेला संधी देणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171 (1) मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदींची माहिती देण्यात आली आहे. केंद्रात ज्याप्रकारे राज्यसभा हे वरीष्ठ सभागृह असते त्याप्रकारे राज्याच्या राजकारणात विधान परिषद हे वरीष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते. पण विधानसभेच्या तुलनेत विधान परिषदेकडे खूपच कमी अधिकार असतात. विधानपरिषद ही विधानसभेप्रमाणे 5 वर्षांनी विसर्जित होत नाही. तर सभागृहातील एकूण सदस्यसंख्येपैकी एक-तृतीयांश सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात.
राज्यात विधानसभेत 288 सदस्य आहेत. तर विधान परिषदेतील सदस्य संख्या 78 इतकी आहे. संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यांतील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किमान 40 असावी. तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश इतकी असू शकते. याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 96 पर्यंत वाढवता येऊ शकते.महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत. त्यातील 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात. तसंच 7 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निर्वाचित होत असतात.याव्यतिरिक्त 12 सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात. वाडःमय, शास्त्र, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच राज्यपालांकडून विधानपरिषदेवर नामनिर्देशित केले जाते.
विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रकिया नाही. राष्ट्रपती निवडणूक, सिनेट यासारख्या निवडणुकीसाठी पसंतीक्रमाची पद्धत इथे वापरली जाते. निवडणुकीसाठी जितके उमेदवार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो.संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करते. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकांची मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मते जो पूर्ण करील तो उमेदवार विजयी होईल. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही.विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते.