राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज दणक्यात सुरुवात झाली. विधानसभेत पहिल्या दिवशी केवळ शोकप्रस्ताव सादर करण्यात आला, पण विधानपरिषदेत मात्र कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरून थोडीशी गरमागरमी झाली. तत्पूर्वी, शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच ठाकरे गटाच्या नेत्याला त्यातही विशेषतः खासदार संजय राऊत यांच्या बंधूंना तालिका अध्यक्ष म्हणून मानाचे पान देण्यात आले. यामुळे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक वाढत असल्याची चर्चा रंगली आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांना तालिका अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. सुनील राऊत हे ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ मानले जाणारे खासदार संजय राऊत यांचे बंधू आहेत. त्यामुळे त्यांना ही संधी दिल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सूत्र्यांच्या मते, हे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढत्या जवळीकतेचे द्योतक असल्याचेही संकेत आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार तथा आदित्य ठाकरे यांचे विश्वासू वरुण सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी ही भेट घेतल्याचे सांगितले. पण सरदेसाई असो किंवा संजय राऊत हे दोघेही ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे आहेत. त्यामुळे सरदेसाईंची मुख्यमंत्र्यांशी झालेली भेट व सुनील राऊतांना मिळालेले मानाचे पान हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या आमदारांना चॉकलेट भेट देऊन त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी स्वतः विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात जाऊन ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी दानवे व आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव, अनिल परब यांच्यासह काँग्रेस नेते सतेज पाटीलही उपस्थित होते. यामुळेही भाजप व ठाकरे गटातील दुरावा मिटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.दरम्यान, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला देण्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता या चर्चेला मूर्त रुप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.