लोहगाव, पुणे: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या वचनाला अनुसरून, लोहगावमधील पाणीपुरवठा नियमित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण वचनपूर्ती बैठक रविवारी (ता. ३) प्राईड एशियाना सोसायटी येथे पार पडली. या बैठकीत स्थानिक नागरिक, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते
गेली अनेक वर्षे लोहगाव भागात पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न नागरिकांची डोकेदुखी ठरला आहे. महानगरपालिकेत समावेश होऊनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यावर आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सातत्याने या भागाची पाहणी व पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.
या वचनपूर्ती बैठकीत नागरिकांनी रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, कर संकलन, पोलीस सुरक्षा, अवैध व्यवसाय आदी समस्याही पठारे यांच्यासमोर मांडल्या. त्यावर तात्काळ कार्यवाही करत आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच, लोहगावमध्ये सहा ठिकाणी ट्रॅफिक पोलीस तैनात करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राजेंद्र खांदवे म्हणाले, “लोहगावचा सात वर्षांपूर्वी महापालिकेत समावेश झाला, मात्र अजूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. नागरिकांना पाण्यासाठी व इतर मूलभूत सुविधांसाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. आजपर्यंत नागरिकांनी पाण्यासाठी लाखो रुपये मोजले आहेत हे मोठे दुर्दैव आहे. परंतु बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्यामुळे एक एक करून विविध समस्या मार्गी लागत आहेत.”
लोहगावातील पाणीपुरवठा समस्येवर बोलताना कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर यांनी “न्याती, उत्तरेश्वर-निंबाळकर रस्ता, बी यु भंडारी टाकी ते प्राईड एशियाना आणि प्राईड एशियाना ते स्पार्क स्प्रिंग या चार झोनमध्ये रोज पाणीपुरवठा करू”, असे सांगितले. यावर पठारे यांनी ज्या सोसायटींना पाण्यासाठी महापालिकडे अर्ज करा, जेणेकरून लवकरात लवकर पाण्याच्या लाईन जोडून देता येतील, असे सुचवले.
तसेच, खराडी बायपास श्री पार्क पासून ते महालक्ष्मी लॉन्स दरम्यान २५० व्यासाची व ११०० मीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच, ५००० लीटर प्राथमिक पाण्याच्या टाकीचे उद्घाटन व लोहगाव-संतनगर इंडियन ऑइल पेट्रोल पंप शेजारील रस्ता तसेच प्राईड एशियाना सोसायटी जवळील रस्त्याचे भूमिपूजनही यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी प्राईड एशियाना सोसायटीचे चेअरमन गिरीश जयवाल यांच्या हस्ते आमदार पठारे यांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांनी आमदारांच्या या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करत लोहगावच्या विकासासाठी अशाच सातत्यपूर्ण कार्याची अपेक्षा व्यक्त केली.
वचनपूर्ती बैठक व इतर प्रसंगी कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर, शाखा अभियंता सुधीर आलोरकर, राजेंद्र खांदवे, सुनील खांदवे, प्रीतम खांदवे, अन्वर मुल्ला, नितीन जाधव, शिंदे, तसेच सोसायटी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
प्रचारादरम्यान लोहगावकरांना दिलेल्या प्रत्येक वचनांची पूर्ती करण्यासाठी मी विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे, यात नागरिकांसोबत अधिकारी वर्गाचेही चांगले सहकार्य लाभत आहे. लोहगाव भागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्नाला प्राधान्य देऊन टॅंकमुक्त लोहगाव हे उदिष्ट साध्य होताना दिसेलच सोबत इतरही प्रश्न मार्गी लावून लोहगावचा सर्वांगीण विकास साकार करण्याचा संकल्प पूर्ण करणार आहे.
- बापूसाहेब पठारे (विद्यमान आमदार, वडगावशेरी मतदारसंघ)

