मिरजच्या “लावणी महोत्सवात” मान्यवरांचे मत..!
महाराष्ट्राची लावणी अभिजात असून तिला उत्तर पेशवाई काळापासून थोर वारसा लाभलेला आहे. मात्र अलीकडच्या काळात लावणी जिथे वाढली, मोठी झाली, शाता समुद्रा पलीकडे गेली, त्या लावणीला संगीतबारी कला केंद्रावर डीजेच्या धिंगाण्याचा सामना करावा लागत असून ही दुर्दैवी गोष्ट आहे. अशी चिंता मिरज (सांगली ) येथे तीन दिवस सुरू झालेल्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवात मान्यवरांनी व्यक्त केली.
शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित केला जातो आणि त्यात पारंपरिक लावणीचे दर्शन घडविणाऱ्या किमान नऊ कला पथकांना कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली जाते यावर्षी चौफुला,मोडनिंब, वेळे कला केंद्रातील कला पथकांनी आपली कला सादर केली. या लावणी महोत्सवाचे उद्घाटन सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले.
. त्यापूर्वी “पारंपरिक लावणीचे बदलते स्वरूप” या विषयावर सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या परिसंवादाचे अध्यक्ष पद लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉ.प्रकाश खांडगे यांनी भूषविले, तर लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. गणेश चंदनशिवे, जेष्ठ पत्रकार आणि लोककला अभ्यासक खंडूराज गायकवाड, प्रख्यात लावणी नर्तिका हेम सुवर्णा मिरजकर, लावणी सम्राज्ञायी प्रमिला लोदगेकर आणि किनवटचे लोकसाहित्याचे अभ्यासाक प्राध्यापक डॉ. रामप्रसाद तौर या मान्यवरांनी परिसंवादात सहभाग घेतला होता. आज लावणी डीजेच्या विळख्यात सापडली आहे असे स्पष्ट मत खंडूराज गायकवाड आणि प्रमिला लोदगेकर यांनी व्यक्त केले. शासनाने संगीतबारी कला केंद्रासाठी स्वतंत्र नियमावली तयार करणे गरजेचे आहे आणि केवळ गृह खात्यावर अवलंबून न राहता, सांस्कृतिक कार्य विभागाचा शिफारस असेल तरच त्या कला केंद्राना प्रयोग सादरी करण्याचा परवाना दिला जावा. असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.आज अभिजन वर्गातील चित्रपटाचे ग्लॅमर लाभलेल्या मुली लावणी सादर करू लागले आहेत. लावणीला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर अभिजन वर्गाची नजर या कलेकडे गेली.
मात्र सत्यभामाबाई पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर,विठाबाई नारायणगावकर, रोशन सातारकर यांची लावणी अभिजात होती आणि अभिजातच राहणार असे प्राध्यापक डॉ. खांडगे यांनी स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले. लावणी बदलली आहे हे सांगताना प्रा. डॉ. चंदनशिवे यांनी बाजीराव मस्तानी मधील ‘नभातून आली अप्सरा’ हा कटाव सादर केला. हेमसुवर्णा मिरजकर यांनी यावेळी प्रत्यक्ष पारंपरिक लावणीचे दर्शन घडविले. प्रमिला लोदगेकर यांनी संगीतबारी कला केंद्रावर डीजे चा धुडगूस चालू असल्याने संगीतबारीतील पारंपारिक वाद्य मोडीत निघतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. डीजेमुळे कला केंद्रातील पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या कलावंतांवर उपासमारीची वेळ येईल. अशी चिंता खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केली. या परिसंवादामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी संदीप बलखंडे यांनी सध्या कलावंतांकरिता शासन राबवित असलेल्या योजनाची सविस्तर माहिती दिली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय यशस्वीरित्या तीन दिवस राज्य लावणी महोत्सवाला सुरुवात झाली असून ही परंपरा टिकविण्यासाठी तमाशा आणि लावणी महोत्सवाचे आयोजन केले जाते. असे त्यांचे मत आहे. या महोत्सवाची संपूर्ण नियोजन स्थानिक नेते सुरेश आवटी यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनातून होत आहे.