- राजकारण करून तसेच सूडबुद्धीने गृहमंत्र्यांना राजीनामा मागणे देखील योग्य नाही असे बाबा कांबळे म्हणाले
पिंपरी : प्रतिनिधी
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात युवतीवर घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आंदोलन केले. मात्र त्यांना या विषयावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याची खरमरीत टीका महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली. प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष संघटनेत महिलांवर अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय पदाधिकाऱ्यांचा भरणा असल्याचा आरोप बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला. तसेच या संवेदनशील प्रश्नांमध्ये राजकारण करणे चुकीचे आहे. या प्रश्नांमध्ये राजकारण करून गृहमंत्र्याचा राजीनामा मागणे अत्यंत चुकीचे असल्याचेही बाबा कांबळे म्हणाले.
बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, प्रशांत जगताप यांचे हे आंदोलन बेगडीपणाचे आहे. प्रशांत जगताप यांचा महिलांवर अत्याचार करणाऱ्या परप्रांतीयांवर अधिक विश्वास आहे. अशा आरोपींना पक्ष संघटनेत सामील करून पाठिंबा दिला जात आहे. त्यामुळे अन्याय करण्याचे बळ या परप्रांतीय गुन्हेगारांना मिळत आहे. असे असताना दुसरीकडे स्वारगेटच्या अत्याचार प्रकरणावर प्रशांत जगताप यांनी आंदोलन करून दिखावा केला आहे. त्यामुळे अगोदर आपल्या पक्षातील महिलांवर अन्याय करणाऱ्या परप्रांतीयांना धडा शिकवावा. त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. नंतर इतर महिला अत्याचार प्रकरणी बोलावे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले. जोपर्यंत स्वतःच्या पक्षातील अपराधी असणाऱ्या कार्यकर्त्यांवर पायबंद घालत नाही. तोपर्यंत त्यांना दुसरा घटनेबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार राहत नाही, अशी टीका महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे.
पुणे शहरात काही दिवसांपूर्वी परप्रांतीय व्यक्तीच्या जाचाला कंटाळून एका महिलेने अंगावरती रॉकेल ओतून घेतले होते. या महिलेला ६० टक्के पेक्षा अधिक अपंगत्व आले. ज्या परप्रांतीय व्यक्तीमुळे या महिलेवर आत्महत्या करण्याची वेळ आली. तो परप्रांतीय व्यक्ती प्रशांत जगताप यांच्या पक्षाचा वाहतूक विभागाचा पदाधिकारी आहे. महाराष्ट्रीयन महिलांवर अन्याय करणाऱ्या अशा परप्रांतीय गुंडांना प्रशांत जगताप पाठीशी घालत आहेत, असा आरोप बाबा कांबळे यांनी केला आहे.
या विषयात राजकारण करून वेगळे वळण देणे योग्य नाही. त्यामुळे त्या विषयाचे गांभीर्य राहत नाही. तसेच सूडबुद्धीने गृहमंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे देखील योग्य नाही असे बाबा कांबळे म्हणाले

