पुणे-गांधी विचार साहित्य संमेलनाचे आयोजन दि. ७, ८ व ९ मार्च २०२५ या कालावधीत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता होत असून संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ संपादक व विचारवंत सुरेश द्वादशीवार आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते व राज्यसभेचे खासदार मनोजकुमार झा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन संपन्न होणार आहे, अशी माहिती संयोजक व गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आणि स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली. याप्रसंगी विश्वस्त सचिव अन्वर राजन, युवक क्रांती दल राज्य संघटक अप्पा अनारसे आणि स्वागत समिती सदस्य प्रसन्न पाटील उपस्थित होते.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ संपादक व विचारवंत सुरेश द्वादशीवार, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी, ज्येष्ठ पर्यावरणवादी नेत्या मेधा पाटकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ सोनम वांगचुक, ‘राजीव गांधी पुरस्कारा’चे मानकरी राम पुनियानी, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, नई तालीम संस्थेच्या संचालिका सुषमा शर्मा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आनंद कुमार, धम्मसंगिनी रमा, उद्योगपती अरुण फिरोदिया आदी विशेष मान्यवरांचा सहभाग हे विशेष आकर्षण असणार आहे. उद्घाटन सोहळा, परिसंवाद व चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम अशा तीन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम असणाऱ्या या गांधी विचार साहित्य संमेलनात पुस्तक प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले असून, महात्मा गांधींवर लिहिलेली हजारो पुस्तके येथे विक्रीसाठी उपलब्ध असतील.
या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रथम सर्वधर्म प्रार्थना संपन्न होईल. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ संपादक व विचारवंत सुरेश द्वादशीवार या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवतील. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते व राज्यसभेचे खासदार मनोजकुमार झा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होईल. यानंतर रात्री ८ वाजता ‘भारतीय संविधान का संगीतमय सफर’ हा संविधानिक मूल्यांचा उद्घोष करणाऱ्या हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम सादर होईल. याची संहिता लक्ष्मीकांत देशमुख यांची असून, प्रदीप निफाडकर, धनंजय पवार आणि साथीदार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. एकूण आठ सत्रांत विविध परिसंवाद व चर्चा होणार आहेत.

