पुणे: श्री वृद्धेश्वर सिद्वेश्वर मंदिर हे पुणेकरांचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान आहे. राजमाता जिजाऊंनी बालशिवबा यांना सोबत घेऊन सोन्याचा नांगर फिरवून पुण्याची स्थापना केली. त्यावेळचे पुनवडी ते आताचे पुणे या समृद्ध प्रवासाचे साक्षीदार हे श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिर परिसरातील दुमजली अभ्यासिका बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी महादेवाचे दर्शन देखील घेतले.
अजित पवार म्हणाले, वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिराला ऐतिहासिक व पौराणिक महत्व असून शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. धार्मिक कार्यासोबत सामाजिक सेवेचे सातत्य या ट्रस्टने कायम ठेवले आहे. पुणे हे जागतिक पटलावर महत्वाचे शहर म्हणून ओळखले जावे, असे काम करूया. पुरातन वास्तूंशी आपण भावनिकपणे जोडले गेले आहोत. त्यामुळे त्या पुढच्या पिढीपर्यंत टाकाव्या हा प्रयत्न करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
हनुमंत बहिरट पाटील म्हणाले, विश्वस्त मंडळाने मंदिराच्या परिसराचा विकास करण्यावर भर दिला आहे. समाजातील अनेक व्यक्तींना एकत्र आणून देवस्थानचे विकास करण्याचे उद्दिष्ट भविष्यातही साध्य करण्यात येणार आहे. त्यातील एक भाग म्हणून अभ्यासिका उभारण्यात येत असून पुढील वर्षभरात अभ्यासिकेच्या उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. पुरातनपणा जपत नवीन सुद्धा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

