प्राचार्य रमणलाल शहा लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज एक युग प्रवर्तक सेनानी’ या ग्रंथाचे प्रकाशन
पुणे : जातीच्या जाणीवेने लिहिलेला इतिहास बाधित होतो. जातीयवाद समर्थनीय नाही. जितका ब्राह्मणांमध्ये जातिवाद आहे तितकाच मराठा आणि इतर जातीत देखील जातीयवाद पहायला मिळतो. त्यामुळे इतिहास अभ्यासून विवेकाने शिकवावा लागतो. आज संस्कृती बिघडली आहे. राजकारण रसातळाला गेले आहे. आजच्या काळात समाजाला शुद्ध प्रबोधनाची गरज आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
प्राचार्य रमणलाल शहा लिखित छत्रपती शिवाजी महाराज एक युग प्रवर्तक सेनानी या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झाले. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, अर्थतज्ञ अभय टिळक, लेखक प्राचार्य रमणलाल शहा, उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक सुनिताराजे पवार, कार्यवाह शिरीष चिटणीस यावेळी उपस्थित होते.
प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ब्राह्मण किंवा अभिजनांनी इतिहास चुकीचा लिहिला असे नाही. बहुजनांनी देखील चुकीचा इतिहास लिहिलेला आहे. अभिजन, बहुजन हा वेडेपणा आहे. गुण आणि दोष दोन्हीकडे आहेत. सर्व देशातील महापुरुष, सर्व धर्मातील संत, सर्व देशातील ज्ञान विज्ञान अध्यात्म या सर्वांच्या बेरजेवरच मानवधर्माचे भले होणार आहे. विष पेरणीच्या कालखंडात दुभंग वातावरणात रमणलाल शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील पुस्तक लिहून आदर्श निर्माण केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वारगेट येथे तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाला. अशा घटना घडत असतील तर हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कसा? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे का ? असा विचार करायला हवा. राजकारणांचे रयतेवर प्रेम नाही. राजकारण्यांवर रयतेचे प्रेम नाही तरीही लोकशाही चालू आहे याला लोकशाही म्हणायची का? असा प्रश्न श्रीपाल सबनीस उपस्थित केला.
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, समाजाचे चारित्र्य घडविण्यासाठी पुस्तके आवश्यक आहेत. शिवाजी महाराज हे समाजासाठी दीपस्तंभासारखे आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील पुस्तके सातत्याने यायला हवीत. लोक पुस्तके वाचतात आणि त्याचा फायदाही समाजाला होतो. प्रा. शहा यांना लेखन करण्याकरिता घरामध्ये पोषक वातावरण करावे, त्यामुळे त्यांना आगामी काळात साहित्य निर्मिती करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
रमणलाल शहा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राध्यापक आणि शिक्षक यांना तो आधी समजावून देण्याचा प्रयत्न मी आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा या शब्दाला ओळख दिली. खेडूत तरुणांमधून त्यांनी मावळे उभे केले. ते चारित्र्यवान निष्कलंक राजे होते, असेही त्यांनी सांगितले. सुनीता राजे पवार, सुधाकर जोशी, अभय टिळक यांनी मनोगत व्यक्त केले. सुजित शेख यांनी सूत्रसंचालन केले. नेहा शहा – दावडा यांनी आभार मानले.

