पुणे-राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ व राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते औंध येथे करण्यात आले. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे (ऑनलाईन), सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.प्रत्येक बालकाचे आरोग्य व उज्ज्वल भविष्याची जबाबदारी शासन पूर्ण निष्ठेने पार पाडत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांना सशक्त व निरोगी जीवनाची हमी देण्याचे कार्य हे या मोहिमेतून सर्वांनी मिळून यशस्वी करुया,असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालके, किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्यतपासणी करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले पोस्टर,बोधचिन्ह, ॲनेमियामुक्त भारत मोहीम पोस्टर्स व फ्लिप बुकचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.‘निरोगी बालपण आणि सुरक्षित भविष्य’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील ० ते १८ वर्षापर्यंतची बालकांची आरोग्य विषयक तपासणी करण्यात येणार आहे. बालकांमधील आजाराचे वेळेत निदान करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असून त्यांना आगामी काळात निरोगी व सुरक्षित आरोग्य जगता येणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच आरोग्य विभागाच्या पथकांनी मिळून काटेकोरपणे नियोजन करावे. अतिशय नीटनिटके, पारदर्शक आणि लोकांप्रती उपयुक्त अशाप्रकाची कामे करुन ही मोहीम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी प्रयत्न करावे, यामाध्यमातून आगामी काळात आरोग्यसंपन्न पिढी निर्माण करण्याचे काम करुया, असेही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, शहरी आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते.

